75 वृक्षांच्या रोपणातून घोलप महाविद्यालयामध्ये सुजलाम सुफलाम राष्ट्राचा संदेश
पुणे : संपूर्ण देशभरामध्ये भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचा आनंद साजरा होत असताना सुजलाम सुफलाम राष्ट्र व पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याच्या हेतूने पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे बाबुरावजी घोलप महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय छात्र सेना आणि देवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हर घर तिरंगा जनजागृती व वृक्षारोपण उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमाचे उद्घाटन पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेचे उपायुक्त सुभाष इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, देवा फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा योगिता मस्के, उपप्राचार्य डॉ. लतेश निकम, कार्यालयीन अधीक्षक शंकर अलकुंटे, लेफ्ट. विठ्ठल नाईकवाडी यांची प्रमुख उपस्थिती होती.
या उपक्रमाविषयी अधिक माहिती देताना प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त करण्यात येत असलेल्या 75 वृक्षांच्या रोपणाची संकल्पना स्पष्ट केली. तसेच झाडे लावण्याबरोबरच झाडे जगवणे देखील महत्वाचे आहे, असे नमूद करत राष्ट्रीय छात्र सेनेच्या प्रत्येक छात्राने एक झाड दत्तक घेत ते जगवण्याचा संकल्प करावा, असे आवाहन केले.
पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेचे उपायुक्त सुभाष इंगळे यांनी महाविद्यालयातर्फे आयोजित करण्यात येणार्या विविध सामाजिक व पर्यावरण पूरक उपक्रमाबद्दल महाविद्यालयाचे कौतुक केले. त्याचबरोबर हर घर तिरंगा अभियानाविषयी माहिती देत महानगरपालिकेच्या सहकार्याने पिंपरी चिंचवडला हरित शहर बनवण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा असे मत व्यक्त केले.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते ध्वजाचे वाटप करण्यात आले. तसेच महाविद्यालयाच्या परिसरामध्ये बहवा, बकुळ, तामण, चिंच, पळस, रोहितक, चारोळी, आपटा, सीता अशोक, पुत्रांजिवा, पाडळ, गणेर, हादगा, सोनचाफा, कळम, कदंब, वारस, वायवरणा, मधुमालती, समुद्रशोक, कवठ, सोमवेल, मुरूडशेंग, ब्लू बेल, लसण्या वेल, जाई – जुई, चमेली, निशिगंध अशा विविध फुल, वेल व औषधी प्रजातींच्या 75 वृक्षांचे रोपण करण्यात आले.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रणित पावले, संभाजी पठारे, बाबाजी गायकवाड, शुभम दौंड यांच्यासह राष्ट्रीय छात्र सेनेच्या सर्व छात्रांनी परिश्रम घेतले.
