Sunday, September 6, 2026
Latest NewsPUNE

शंभर टक्के प्राध्यापक पदभरतीचे धोरण लवकरच आणणार – डॉ. धनराज माने

पुणे : स्वायत्त महाविद्यालयांमध्ये शंभर टक्के प्राध्यापक पदभरतीचे धोरण लवकरच आणणार असल्याची घोषणा राज्याचे शिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांनी केली.

‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’च्या (डीईएस) ‘इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च’च्या (आयएमडीआर) वतीने ‘अभिवृद्धी : मेकिंग इंडिया ए फाइव्ह ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी’ या पुस्तकाचे प्रकाशन करताना माने बोलत होते.

डीईएसचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. उपाध्यक्ष महेश आठवले, कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी, विश्वस्त जगदीश कदम, आयएमडीआरच्या संचालिका डॉ. शिखा जैन यांची प्रमुख उपस्थिती होती.

माने म्हणाले, “ज्ञानाचा प्रचार, प्रसार, निर्मिती आणि संवर्धन करण्यासाठी शिक्षणाची समाजाशी नाळ जोडली पाहिजे. सकल देशांतर्गत उत्पन्न (जीडीपी) वाढविण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही. त्यासाठी नवीन शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्याची आवश्कता आहे.”

कुंटे म्हणाले, “पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रत्येक भारतीयाने प्रबळ इच्छाशक्ती दाखविली पाहिजे, गुणवत्ता आणि कार्यक्षमता वाढवावी लागेल. निर्यातीचा वेग वाढवून आयात कमी केली पाहिजे. त्यासाठी आवश्यक संशोधनाला चालना देणे आवश्यक आहे. शिक्षणाचे सक्षमीकरण, स्वयंरोजगाराला प्राधान्य, भ्रष्टाचारमुक्त व्यवस्था, सांस्कृतिक परंपरांची जागृती व प्रबळ इच्छाशक्तीद्वारे समृद्ध आणि संपन्न भारताचे स्वप्न प्रत्यक्षात येईल.”

कदम म्हणाले, “आर्थिक महासत्ता होण्यासाठी तंत्रज्ञान, आधुनिकीकरण आणि डिजिटलयाझेशन गरजेचे आहे.” पाच ट्रिलियन डॉलरचे लक्ष्य गाठण्यासाठी विविध क्षेत्रात काय करता येईल याबाबतचे संशोधनात्मक लेखांचा या पुस्तकात समावेश असल्याचे आठवले यांनी सांगितले.

डॉ. जैन यांनी प्रास्ताविक केले, डॉ. प्रतिक्षित महांकाळ यांनी सूत्रसंचालन, डॉ. श्रृती नागर यांनी परिचय आणि प्रा. प्रज्ञा महाजन यांनी आभार प्रदर्शन केले.

लवकरच फर्ग्युसनची पदवी

फर्ग्युसन महाविद्यालयाला स्वायतत्ता मिळालेली असून, सध्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे पदवी प्रमाणपत्र दिले जाते. लवकरच फर्ग्युसनला स्वत:चे पदवी प्रमाणपत्र देता येईल. तो दर्जा प्राप्त करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या यादीत फर्ग्युसनचा समावेश करण्यात आला आहे. लवकरच ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि विद्यार्थ्यांना फर्ग्युसनचे पदवी प्रमाणपत्र मिळू शकेल असे सुतोवाच माने यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading