fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsPUNE

पुणे जिल्हा परिषदेमार्फत १६ ऑगस्टपर्यंत ‘हर घर तिरंगा, हर घर पोषण’ उपक्रम

पुणे : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे. याअंतर्गतच महिला व बालविकास विभागाच्या सूचनेनुसार पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने ‘हर घर तिरंगा!, हर घर पोषण!!’ (घरोघरी तिरंगा! घरोघरी पोषण!!) उपक्रम राबवण्यात येणार आहे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी कळवले आहे.

एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यात २१ ग्रामीण प्रकल्पांतर्गत ४ हजार ६६९ अंगणवाडी केंद्रे आहेत. आजादी का अमृतमहोत्सव- हर घर तिरंगा अंतर्गत या प्रकल्पांमध्ये, अंगणवाडी केंद्रांमध्ये विविध प्रकल्प राबवण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्यावतीने देण्यात आल्या आहेत.

जनजागृती उपक्रमाअंतर्गत ९ ऑगस्ट रोजी सर्व अंगणवाडी पर्यवेक्षीका, सेविका, मदतनीस गृहभेटीदरम्यान जनजागृती करुन राष्ट्रध्वज उभारणीबाबत कुटुंबांना प्रोत्साहित करतील. तसेच अंगणवाडी केंद्रांच्या दर्शनी भागात ‘हर घर तिरंगा!, हर घर पोषण!!’चे बोधचिन्ह रंगवण्यात येईल.

गाव स्तरावर महिला मेळावे १० ऑगस्ट घेण्यात येणार असून त्यामध्ये पूरक आहार, आरोग्य, महिला सुरक्षाविषयक कायदे व महिलांचे अधिकार याविषयी माहिती देण्यात येईल. याशिवाय स्वातंत्र्यलढ्यातील महिला क्रांतीकारकांचे योगदान याविषयीही माहिती देण्यात येईल.

११ ऑगस्ट रोजी मोबाईल दुष्परिणाम विषयक मार्गदर्शन, १२ ऑगस्ट रोजी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची तिरंगा घोषवाक्य, तिरंगा चित्रकला स्पर्धा आयोजित करून विजेत्यांना प्रकल्पस्तरावर प्रमाणपत्र देऊन सन्माणित करण्यात येईल.

प्रत्येक अंगणवाडी केंद्रावर १३ ऑगस्ट रोजी ‘गोपाळांची पंगत’ हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. यामध्ये गावातील दानशूर व्यक्ती, पतसंस्था, बचत गट, सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी यांच्यामार्फत सकस आहार विशेषत: सात दिवस सलग ‘फळांची पंगत’ हा अभिनव उपक्रम राबवण्यात येणार आहे. तिरंगा ध्वजाच्या रंगासारखे रोज एका रंगाचे फळ याप्रमाणे पंगत करण्यात येणार आहे.

अंगणवाडी केंद्र, बीट तसेच प्रकल्प स्तरावर १४ ते १५ ऑगस्ट रोजी पोषक पाककृतीचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. यामध्ये फळे, भाज्या, दुग्धजन्य पदार्थ आदी स्वरुपात परिपूर्ण असा तिरंगा आहाराचे महत्व, पोषण थाळी याबाबत गर्भवती महिलांचे कुटुंबिय तसेच कुपोषित बालकांचे पालक यांना मार्गदर्शन करण्यात येईल.

किशोरी मेळावे १६ ऑगस्ट रोजी घेण्यात येऊन त्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्राच्या ठिकाणी आरोग्यविषयक, योग्य व चौरस आहार विषयक तसेच बालविवाहाचे दुष्परिणाम आदींबाबत मार्गदर्शन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading