fbpx

सर्पदंशावर उपचारासाठी ‘डेडीकेटेड’ केंद्र उभारण्यासाठी प्रयत्न सुरु – डॉ.सदानंद राऊत

पुणे  : “ सर्पदंशाने होणाऱ्या मृत्यूची राजधानी मानल्या गेलेल्या भारतात अलीकडील काळात सर्पदंश याविषयावर जागरूकता वाढली आहे. ‘शून्य सर्पदंश मृत्यू’  या  मोहिमेच्या माध्यमातून आम्ही प्रबोधन, प्रशिक्षण आणि उपचार या घटकांवर भर देत आहोत. त्याचबरोबर आगामी काळात सर्पदंश पीडितांना तातडीने आणि योग्य उपचार मिळावे, यासाठी सर्पदंश उपचाराचे ‘डेडीकेटेड’ केंद्र उभारण्यासाठी प्रयत्न सुरु आहे,’’ अशी माहिती  डॉ.सदानंद राऊत यांनी दिली.

पी. एम. शहा फाऊंडेशन आणि वर्धमान प्रतिष्ठान, शिवाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सामान्य ते असामान्य ‘ या कार्यक्रमात डॉ.सदानंद राऊत आणि त्यांच्या पत्नी डॉ. पल्लवी राऊत या दांपत्याची प्रकट मुलाखत घेण्यात आली. डॉ. लिना बोरुडे आणि फाऊंडेशन’चे संचालक अ‍ॅड.चेतन गांधी यांनी राऊत  दांपत्याशी संवाद साधला. याप्रसंगी प्रतिष्ठान’चे अध्यक्ष विलास राठोड, उद्योजक सतीश कोंढाळकर व त्यांच्या पत्नी निवेदिता कोंढाळकर उपस्थित होते. कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते शाल, सन्मानचिन्ह आणि  मानपत्र देऊन डॉ.सदानंद राऊत आणि डॉ. पल्लवी राऊत यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. राऊत यांनी आतापर्यंत ५५०० पेक्षा अधिक सर्पदंश पीडितांवर उपचार करत त्यांचे प्राण वाचविले आहेत. तसेंच विविध शिबिरांच्या माध्यमातून २५,००० हून अधिक रुग्णांची आरोग्य तपासणी केली आहे. भारतात सर्पदंश या विषयावर जनजागृती करण्यात त्यांनी मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी   त्यांचा सत्कार करण्यात आला.

सर्पदंश उपचाराच्या सद्यस्थिती बाबत बोलताना डॉ. राऊत म्हणाले, “ इंडीयन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेकडून सर्पदंशामुळे होणारे मृत्यू हा विषय अतिशय गांभीर्याने घेण्यात आला असून, त्यावर योग्य उपाययोजना करण्यासाठी विविध प्रकल्प राबविले जात आहेत. सर्पदंशावरील उपचारासाठी आवश्यक  असलेल्या लसींबाबत राष्ट्रीय प्रोटोकॉल ठरविण्यात आले आहे. त्याअंतर्गत प्रत्येक प्राथमिक उपचार केंद्रात २० लस उपलब्ध करून देणे आवश्यक असते. प्रत्यक्षात मात्र केवळ ५ लस उपलब्ध करून दिली जाते. प्रशिक्षित डॉक्टर , कर्मचारी यांची कमतरता ही देखील एक मोठी अडचण आहे. मात्र त्यासाठी आता डॉक्टर, आशा वर्कर यांना प्राथमिक उपचारासंदर्भात प्रशिक्षण दिले जात आहे.’’

सर्पदंशावर उपचार करण्यासाठी बराच खर्च येतो. त्यामध्ये लस, औषधोपचार, वैद्यकीय उपकरणे अशा विविध गोष्टींचा समावेश असतो. अनेकदा यासाठी पैसे कुठून आणायचे असा प्रश्न रुग्णाच्या नातेवाईकांसमोर असतो. त्यामुळे या उपचाराचा खर्च कसा कमी करता येईल, यादृष्टीने आमचे प्रयत्न सुरु असून, सिरम इन्स्टिट्यूटतर्फे सर्पदंशावरील कमी किमतीची मात्र प्रभावी लस निर्माण करण्याचे काम सुरु आहे. यामुळे उपचाराचा खर्च निश्चित कमी होईल, असा विश्वास डॉ. राऊत यांनी यावेळी वक्त केला.

ग्रामीण भागात वैद्यकीय उपचारासाठी आजही प्रशिक्षित डॉक्टर आणि  कर्मचारी यांची मोठी कमतरता जाणवते.  त्यामुळे वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या तरुणांनी ग्रामीण भागात जाऊन कार्य करावे. त्याचाबरोबर ग्रामीण भागातील नागरीकांनीही तरुण तरुण डॉक्टरांवर विश्वास ठेवून त्यांना सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. राऊत यांनी यावेळी केले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोनिका जोशी यांनी केले.

Leave a Reply

%d bloggers like this: