…. तेव्हा रातकिड्यांना वाटत की सूर्य हा कायमचा संपला – डॉ. नीलम गोऱ्हे
पुणे : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी ‘देशातील प्रादेशिक पक्ष पुढील काळात संपतील, देशात केवळ भाजप राहील,’ असा दावा केला आहे. यावर शिवसेनेच्या नेत्या व विधानसभेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी आपलं मत व्यक्त केलं. त्या म्हणाल्या, की जेव्हा संध्याकाळ होते तेव्हा रात किड्यांना असं वाटत की सूर्य हा कायमचा संपला. पण सकाळ झाल्यावर त्यांच्या ते बरोबर लक्षात येतं, असा टोला डॉ. नीलम गोऱ्हे यांनी यावेळी जे. पी. नड्डा यांना लगावला.
भारतात कोणत्याही राष्ट्रीय पक्षात भाजपशी लढण्याचे सामर्थ्य राहिलेले नाही. शिवसेनेला घरघर लागली आहे. तर कोंग्रेसचा गाशा अनेक राज्यातून गुंडाळला गेला आहे. उर्वरीत पक्षही संपतील आणि केवळ भाजपा एकाच पक्ष शिल्लक राहील, असा दावा भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी काल केला होता. या विधानावर उद्धव ठाकरे यांच्या पाठोपाठ शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी देखील आपले मत व्यक्त केले आहे.
नीलम गोऱ्हे या आज पुण्यात अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्याकरता आले असता त्यांनी पत्रकारांसोबत विविध मुद्द्यांवर संवाद साधला. यावेळी शिवसेनेचे पुणे शहराध्यक्ष संजय मोरे, गजानन थरकुडे, बाळा ओसवाल व शिवसेनेचे काही पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
एखाद्या झाडावर जसे बांडगूळ असतात तसे या घटनेवर काही लोक बोलतायेत
मुंबई मधील पत्राचाळ प्रकरणातील कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीने खासदार संजय राऊत यांना अटक केली आहे. त्यामुळे राज्यातील राजकारण हे अजूनही तापलेले आहे. मात्र, कुठल्याही व्यक्तीबाबत न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना म्हणजेच तपास सुरू असताना मत व्यक्त करणे योग्य नाही. पण अनेक जण कोणताही अधिकार नसताना एखाद्या झाडावर जसे बांडगुळ असतात तसे या घटनेवर काही लोक बोलत आहे, अशी टीका डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली आहे.
