Saturday, September 5, 2026
Latest NewsPUNE

दिग्गजांच्या आठवणींना उजाळा देत रंगला ‘बेल्स इन रेझोनन्स’चा पहिला दिवस

पुणे : घुंगरांचा छंद, सुर आणि वाद्यांच्या तालाच्या निनादात नेत्र व कर्णसुखाची अनुभुती घेत व दिग्गजांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्याच खास रचनांसह ‘बेल्स इन रेझोनन्स’चा पहिला दिवस रंगला. आपल्या बहारदार नृत्याने लखनौ घराण्यातील प्रसिद्ध कथक नृत्यांगना राणी खनम व रोहिणी भाटे यांच्या शिष्या, नृत्यांगना ऋजुता सोमण यांनी नेत्रदीपक नृत्याविष्कार सादर केला.

शास्त्रीय संगीताच्या प्रसारासाठी कार्यरत ‘ऋत्विक फाउंडेशन’तर्फे शास्त्रीय नृत्य क्षेत्रातील दिवंगत दिग्गज गुरूंना समर्पित पहिल्यावहिल्या ‘बेल्स इन रेझोनन्स’ (घुंगरांचा अनुनाद/निनाद) संगीत महोत्सवाचा पहिला दिवस  पुणेकरांनी अनुभवला. यंदाचा महोत्सव पद्मविभूषण ज्येष्ठ कथक गुरु पंडित बिरजू महाराज व संगीत नाटक अकादमीचा संगीतरत्न पुरस्कारप्राप्त गुरु पंडिता रोहिणी भाटे यांना समर्पित आहे. गुरू राणी खनम, रोशन दाते, अमला शेखर, ऋजुता सोमण यांनी दीपप्रज्वलन करुन उद्घाटन केले.

महोत्सवाची सुरुवात ऋजुता सोमण यांच्या गणेश वंदनेच्या सादरीकरणाने झाली. ही वंदना स्वतः गुरू पंडिता रोहिणी भाटे लिखित होती. नृत्यपक्ष आणि अभिनय पक्ष यांचे उत्तम सादरीकरण त्यांनी केले. समीर पुणतांबेकर (तबला), मनोज देसाई (गायन), तुलसी कुलकर्णी (पढंत), नासीर खान (सारंगी) यांनी साथसंगत केली.

त्यानंतर पंडित बिरजू महाराज यांच्या शिष्या गुरु राणी खनम यांचा नृत्याविष्कार सादर झाला. त्यांनी धृपदाने सादरीकरणाची सुरुवात केली. मिया तानसेन यांची रचना असलेली ‘पूजन चली महादेव से…’ थाट लखनौ अंदाजाच्या खास रचना पेश केल्या. त्यातील लयकारीत रसिक गुंग झाले. जुन्या बंदिशिंमधील तीहाईचे सादरीकरण त्यांनी केले. घुंगरूच्या निनादात रंगलेल्या या महोत्सवात केवळ घुंगरांच्या बोलावर ढगांचे गडगडणे, विजांचे कडकडणे व थेंबांनी बरसात साकारत त्यांनी रसिकांना कलाविष्कारानी चिंब केले. हजरत अमिर खुसरो यांची पर्शियन अवधी बंदिश रचनेने व नंतर तरण्याने त्यांनी आपल्या सादरीकरणाचा समरोप केला. यावेळी अमान अली (तबला), मनोज देसाई (हार्मोनियम व गायन), तुलसी कुलकर्णी (पढंत), नासिर खान (सारंगी) यांची साथसंगत होती.

पहिल्या दिवसाचा समारोप ज्येष्ठ गायक पंडित अजय पोहनकर व त्यांचे सुपुत्र अभिजित पोहनकर यांच्या गायनाने झाला. त्यांनी सादर केलेल्या ठुमरीवरील ऋजुता सोमण यांच्या नृत्याची संगत रसिकांना भारावून टाकणारी ठरली. लगन तुसे लागी बलमा.., त्यांच्याच सजनवा या अल्बममधील ‘रांजिशी सही… सैय्या मोसे बोलो बतिया…’ रचना पेश करत रसिकांची भरभरून दाद मिळविली. तंतू वाद्यातून अनुभवायला मिळणारी मिंड ‘कीबोर्ड’मधून ऐकताना रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. त्यांना मुकुंदराज देव (तबला), मिलिंद कुलकर्णी (हार्मोनियम), शुभम खंडाळकर (स्वरमंडल), संजय सोनार (तानपुरा) यांची साथसंगत होती.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading