राज्यपालांना कोल्हापूरी जोडे दाखवण्याची वेळ आली आहे – उद्धव ठाकरेंचा घणाघात
मुंबई : मुंबईतून जर गुजराती, राजस्थानी लोकांना काढून टाकलं तर आर्थिक राजधानी म्हणून मुंबई ओळखली जाणार नाही असं वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. आता शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही कोश्यारींवर टीका केली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना राज्यपालांना कोल्हापूरी जोडे दाखवण्याची वेळ आली आहे, अशी खोचक टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, की राज्यपालांना कोल्हापूरी जोडे दाखवण्याची वेळ आली आहे. याचा अर्थ कोणी कसा घेईल हे माहिती नाही. जोड्याचा उपयोग, कोण कसा करेन याची खात्री नाही. कोश्यारी यांचं भाषण मुंबईतून दिलं जातं की दिल्लीतून लिहून दिलं जातं हे माहिती नाही, असंही ते म्हणाले.
ठाकरे पुढे म्हणाले, महाराष्ट्राचा अपमान करून त्यांनी मराठी माणसाच्या मनात आग लावलीच आहे. याधीही त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्याबद्दक हिंसक उदगार काढले. यानंतर आता मराठी माणसाचा अपमान केला. राज्यपाल पदाचा अवमान मला करायचा नाही. त्या खुर्चीवर बसणाऱ्याने हा मान राखायला हवा. भगतसिंग कोश्यारी या व्यक्तीनं हा मान ठेवला नाही, अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी केली.
राज्यपालांना घरी पाठवायचं की तुरुंगात पाठवायची, याबद्दल विचार करण्याची वेळ आली असल्याचंही उद्धव ठाकरे म्हणाले. हिंदुंमध्ये फूट पाडण्याचं नीच काम कोश्यारींनी केलं आहे. गेल्या काही वर्षांपासून ज्या महाराष्ट्राचं मीठ खाल्लं तिथेच नमकहरामी केली आहे, असंही ठाकरे म्हणाले.
