fbpx

महापालिकेला चिंता ठेकेदारांच्या ‘इमेज’ची; खड्डे प्रकरणात कारवाई मात्र नावे गुलदस्त्यात

पुणे:दोष दायित्व कालावधीत डिफेक्ट लायबिलिटी पिरियड-डीएलपी संपण्यापूर्वीच रस्त्यांना खड्डे पडल्याने महापालिकेने ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. पहिल्याच दिवशी सहा रस्त्यांना खड्डे पडल्याने ५ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. पण कोणत्या ठेकेदाराला किती रुपयांचा दंड लावला याची ही माहिती मात्र गुलदस्त्यात ठेवली आहे.
शहरातील रस्त्यांची चाळण झाल्याने महापालिकेवर टीकेची झोड उठत आहे. सध्या वेगाने रस्तेदुरुस्ती केली जात असली तरी अवघ्या काही महिन्यांपूर्वी कामे केलेल्या रस्त्यांना खड्डे पडल्याने निकृष्ट कामाचा दर्जाही समोर आला. त्यामुळे महापालिकेने हे काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला.

गेल्या तीन वर्षात डांबरीकरण केलेल्या रस्त्यांची माहिती काढण्यात आली. त्यामध्ये १३९ रस्त्यांचा समावेश आहे. या रस्त्यांची पाहणी करून खड्डे पडल्याने तेथे ठेकेदाराला प्रति खड्डा पाच हजार रुपये दंड लावण्याचा निर्णय घेतला आहे.
धायरी येथील श्री कंट्रोल चौक ते काळूबाई मंदिराकडे जाणारा रस्ता आणि कात्रज येथील नॅन्सी लेकटाऊन परिसर ते पद्मजा पार्क सोसायटी या दरम्यानच्या रस्त्याला खड्डे पडल्याने ठेकेदाराकडून १ लाख ३० हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. पर्वती पायथा येथे गजानन महाराजा मंदिर लक्ष्मी नगर येथील रस्त्याला खड्डा पडल्याने २५ हजार दंड लावला. महंमदवाडी रस्‍ता महापालिका शाळा येथील काम करणाऱ्या ठेकेदाराला २ लाख ३० हजार दंड लावला आहे. तर शिवाजी नगर भागातील हरेकृष्ण पथ रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराला आणि सूस-म्हाळुंगे रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराला प्रत्येकी ७५ हजार आणि ४० हजार रुपये दंड लावण्यात आला आहे.

महापालिकेच्या पथ विभागाने पहिल्याच दिवशी खड्डे पडल्याने सहा ठेकेदारांना ५ लाख रुपयांचा दंड लावला. पण हे निकृष्ट दर्जाचे काम करणारे ठेकेदार कोण याची माहिती पथ विभागाकडून उपलब्ध झाली नाही. रस्त्यांची चाळण होऊन पुणेकरांचे कंबरडे मोडण्याची वेळ आली, पण ठेकेदारांची पोलखोल हो नये म्हणून त्यांची नावे देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचेही समोर आले. दरम्यान, अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार यांनी ठेकेदारांची नावे जाहीर करण्याचे आदेश पथ विभागाला दिले जातील असे सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: