fbpx

शिक्षणातून उद्याच्या समाजाच्या संकल्पचित्र निर्मीतीचा मार्ग – डॉ. अ. ल. देशमुख

पुणे : अन्न, वस्त्र, निवारा या तीन मुलभूत गरजांमध्ये शिक्षण ही देखील मुलभूत गरज आहे. उद्याच्या समाजाचे संकल्पचित्र करण्याचा मार्ग केवळ शिक्षणातून जातो. त्यामुळे आपल्याला सहकाराने आणि सहभागाने कार्य करणारी एकात्मिक शिक्षण पद्धती निर्माण केली पाहिजे, असे मत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ.अ.ल.देशमुख यांनी व्यक्त केले.

शुक्रवार पेठेतील अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टचा म्हसोबा उत्सव महात्मा फुले मंडई, बुरुड आळी येथे आयोजित करण्यात आला आहे. उत्सवात १५०० गरजू मुला-मुलींना फुलस्केप वह्यांची भेट देण्यात आली. यावेळी सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक, श्री कसबा गणपती मंडळाच्या उपाध्यक्ष दीपा तावरे, ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष राहुल सूर्यवंशी, विश्वस्त उपाध्यक्ष निवृत्ती जाधव, महेंद्र कडू, सुधीर साकोरे, योगेश निकम, उमंग शहा, सागर जाधव आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते वह्यांचे देखील पूजन करण्यात आले. उत्सवाचे यंदा १८ वे वर्ष आहे. ट्रस्टचे निवृत्ती जाधव, नितीन जाधव व सुधीर साकोरे यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम घेण्यात आला.

डॉ.अ.ल.देशमुख म्हणाले, धनिक समाजाने गरजू समाजाला सहकार्य करुन समाज विकास करणे, हे कार्यसंस्कृतीचे तत्व आहे. त्याचाच भाग म्हणून आज गरजू विद्यार्थ्यांना ट्रस्टतर्फे वह्या देण्यात आल्या आहेत. प्रत्येकाला उत्तम वाचता आणि लिहिता आले पाहिजे, हे शिक्षणाचे मुलभूत उद््दीष्ट आहे. लेखनासाठी वही आवश्यक आहे. वही हे सरस्वतीचे वाहन आहे, हे वाहन घेऊन विद्यार्थ्यांची उत्तम जडण-घडण होईल व ते लक्ष्मीला आपलेस करतील. भविष्याचे हेच काम करुन समाज विकासाची साखळी तयार होईल. प्रत्येक देवस्थानाने असे कार्य केले, तर संपूर्ण समाजाचे चित्र बदलेल. अशा सकारात्मक उपक्रमांचे जाळे संपूर्ण महाराष्ट्रभर निर्माण व्हावे, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

संदीप कर्णिक म्हणाले, विद्यार्थ्यांनी भरपूर शिकावे आणि यश मिळवावे. दैनंदिन जीवनात खेळणे देखील महत्वाचे आहे. मात्र, खेळ आणि अभ्यासासोबत प्रत्येक गोष्टीत मेहनत घेणे गरजेचे आहे. मेहनत घेऊन आपण आयुष्यात यशाचे उंच शिखर गाठू शकतो, असेही त्यांनी सांगितले. करिश्मा शेख यांनी सूत्रसंचालन केले. अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट पुणे या ट्रस्टच्या फेसबुक पेजवरुन हा उत्सव भाविकांना पाहता येणार असल्याचे ट्रस्टतर्फे सांगण्यात आले.

Leave a Reply

%d bloggers like this: