fbpx

विद्यार्थ्यानी घेतली गुड टच, बॅड टच बद्दल माहिती

पुणे : आज-काल आजूबाजूला अनेक गंभीर प्रकारच्या घटना आपल्याला घडताना दिसतात. त्यामध्ये लहान मुलांवरील अत्याचाराच्या, लैंगिक शोषणाच्या घटना देखील वाढताना दिसत आहेत. त्यामुळे वाईट स्पर्श, चांगला स्पर्श मुलांना कळायला हवा यासाठी न-हे येथील जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूटच्या वतीने पोलीस दीदी व पोलीस काका यांच्या सहकार्याने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी गुड टच, बॅड टच बद्दल पोलीस उपनिरीक्षक अस्मिता लाड यांनी विद्यार्थ्यांना माहिती सांगितली. इयत्ता ५ वी ते १० वी चे विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. तसेच सहा-पोलीस निरीक्षक राहुल औदुंबर यादव यांनीही विद्यार्थ्यांना पोलीस काकांची भीती न बाळगता त्यांच्यावर विश्वास ठेवून होणारे अन्याय अत्याचार कसे रोखले जातील, यासंदर्भात सविस्तर माहिती सांगितली. सर्व विद्यार्थ्यांनी मनमोकळेपणाने पोलीस दीदी व पोलीस काका यांच्याशी संवाद साधला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष अ‍ॅड. शार्दुल जाधवर आदी उपस्थित होते.

समाजामध्ये, कुटुंबात तसेच नातेवाईकांकडून होणाऱ्या अत्याचाराला कसे रोखले जाऊ शकते, या संदर्भात प्रत्यक्ष उदाहरण देऊन पोलीस काकांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले तसेच शालेय परिसरामध्ये छोट्या छोट्या गोष्टीवरून वाढणारे वाद, हिंसा व अन्याय अत्याचार कसा रोखला जातील व पोलिसांची मदत कशी घ्यायची यासंदर्भात देखील सविस्तर माहिती सांगितली. तसेच पोलिसांना मदतीसाठी हेल्पलाइन क्रमांक ११२ वर फोन करावा, अशी माहिती देखील यावेळी देण्यात आली.

तसेच सखी सावित्री मंचाची स्थापना करून मुला-मुलींना सुरक्षित वातावरण व हिंसेपासून वाचवणे त्यांचे रक्षण करणे,पोषक वातावरण निर्माण करणे शाळा सुटल्यानंतर व शाळा भरताना दामिनी पथक फेऱ्या मारतील तसेच मार्शल तेही त्यांच्या पद्धतीने नजर ठेवून राहतील,असे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. तसेच मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना देखील जागृत राहण्यासंदर्भात माहिती दिली व संवाद साधला.

Leave a Reply

%d bloggers like this: