fbpx

खड्ड्यांबाबत सुरू केलेल्या हेल्पलाइनवर मागील तीन दिवसात ३५४ तक्रारी

पुणे : शहरात पावसाचा जोर वाढल्यानंतर रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक अक्षरक्षः वैतागले असून त्याच्या तक्रारींचा ओघ देखील वाढला आहे. नागरिकांना खड्ड्यांबाबतची माहिती देता यावी, यासाठी महापालिकेने सुरू केलेल्या हेल्पलाइनवर मागील तीन दिवसात ३५४ तक्रारी आल्या आहेत. शहरात कुठे खड्डे पडली आहे याची माहिती देत ती बुजविण्याची आर्त मागणी नागरिक या हेल्पलाइनवर  करीत आहेत.
१६ ते १८ जुलै दरम्यान पालिकेकडे ऑनलाइन माध्यमातून २८५, कार्यालयीन दूरध्वनी क्रमांकावर १७ तर भरारी पथक व २४ तास कार्यान्वित मोबाईल क्रमांकावर ५२ तक्रारी आल्या आहेत. या तक्रारींची दखल घेऊन तातडीने क्षेत्रीय कार्यालय, पथ विभागाच्या पथकामार्फत खड्डे बुजविण्यात येत आहेत. याचबरोबर ड्रेनेज चेंबरची खचलेली झाकणे आणि पाणी साचून राहणारी ठिकाणे यांची माहितीही नागरिक कळवत आहे. नागरिकांनी दिलेल्या माहितीवरून त्वरित कार्यवाही केली जात असल्याची माहिती महापालिकेच्या पथ विभागाकडून देण्यात आली.
खोदकामानंतर रस्त्यांवर तात्पुरती मलमपट्टी केली जात आहे. त्यामुळे रस्त्यांची दुरवस्था झाल्याचे चित्र शहरात अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. खोदार्इ केलेल्या सर्व रस्त्यांचे पावसाळ्यानंतर पुर्नडांबरीकरण केले जाणार आहे. त्यामुळे सध्या वाहनचालकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना खड्ड्यांबाबतची माहिती कळवता यावी, यासाठी महापालिकेने हेल्पलाइन क्रमांक सुरू केले आहेत.

या नंबरवर कळवा खड्ड्यांची माहिती –

शहरातील रस्त्यांच्या खड्ड्यांच्या तक्रारीसाठी कार्यालयीन वेळेत ०२०-२५५०१०८३ या क्रमांकावर संपर्क साधावा. तर भरारी पथकाशी ९०४९२ ७१००३ या क्रमांकावर २४ तास संपर्क करता येईल.

Leave a Reply

%d bloggers like this: