fbpx

राज्यातील शिक्षकांसाठी विदेशी भाषा प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याचा मानस – विकास गरड

पुणे : “ नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात विविध भाषांचा समावेश करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. सध्या त्रिभाषिक सूत्राचा अवलंब केला जात आहे. मात्र ज्या मुलांना परदेशी भाषा शिकण्याची इच्छा असते, त्यांच्यासाठी सर्वात मोठी अडचण असते, ती प्रशिक्षित शिक्षकांची उपलब्धता राज्यात ६५,००० शासकीय शाळा असून, एकूण शाळा या १, १०,००० इतक्या आहेत. या शाळांमध्ये एकूण ७.५ लाख शिक्षक शिकवत आहेत. ज्या शिक्षकांना परदेशी भाषा शिकण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी आम्ही ग्योथं इन्स्टिट्यूटसारख्या संस्था आणि भाषा तज्ज्ञांच्या मदतीने परदेशी भाषेचे प्रशिक्षण आयोजित करण्याच्या विचार करत आहोत,’’ अशी माहिती राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे (एससीईआरटी) उपसंचालक विकास गरड यांनी दिली.

लहान मुलांना गमतीशीर मार्गाने विज्ञानाची माहिती देत, त्यांच्यामध्ये विज्ञान विषयाची आवड निर्माण करण्यासाठी ग्योथं इन्स्टिट्यूट मॅक्स म्युलर भवनने ‘किंडर उनी मराठी ’ हे मोफत डिजिटल व्यासपीठ विकसित केले असून, रविवारी, दि. १७ जुलै रोजी संस्थेच्या प्रांगणात आयोजित सोहळ्यात गरड यांच्या हस्ते ‘किंडरउनी मराठी’ चे लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमानंतर उपस्थितांशी संवाद साधताना गरड यांनी ही माहिती दिली. यावेळी संस्थेच्या उपसंचालक तेजस्वी वर्तक, PASCH प्रकल्पाच्या साउथ एशियाच्या प्रमुख आंद्रेआ वाल्टर, संस्थेच्या पुण्यातील प्रकल्प समन्वयक वैशाली दाबके आणि मुंबई येथील प्रकल्प समन्वयक जयश्री जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. या सोहळ्यात पुण्यातील दहा मराठी शाळा सहभागी झाल्या होत्या. यामध्ये भोर तालुक्यातील एक आणि गोऱ्हे बुद्रुक गावातील एक अशा दोन ग्रामीण शाळांचाही समावेश होता. याप्रसंगी विद्यार्थ्यांसाठी प्रायोगिक वर्ग, कार्यशाळा, प्रश्नमंजूषा अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. बक्षीस वितरणाने कार्यक्रमाचा समारोप झाला. पुढील रविवारी, दि. २४ जुलै रोजी असाच कार्यक्रम मुंबई आणि परिसरातील मुलांसाठी आयोजित करण्यात येणार आहे.
या प्रकल्पाबाबत माहिती देताना प्रकल्प समन्वय वैशाली दाबके म्हणाल्या, “ लहान मुलांमध्ये विज्ञान विषयाची आवड निर्माण करण्यासाठी आम्ही हा प्रकल्प राबवित आहोत. यामध्ये तंत्रज्ञान विज्ञानाबरोबरच निसर्ग आणि मानववंशशास्त्र या विषयांचाही समावेश असणार आहे. प्रामुख्याने ८ ते १२ वयोगटातील मुलांसाठी हा प्रकल्प राबविण्यात येणार असून, ‘किंडर उनी मराठी’च्या माध्यमातून लहान मुले स्वत: या व्यासपीठावर उपलब्ध धडे शिकू शकतात आणि मुलांचे पालक अथवा शिक्षक मुलांच्या अभ्यासावर देखरेखही करू शकतात. या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे मुलांना या माध्यमातुन जर्मन भाषेतील काही शब्द आणि त्यांचे उच्चारही शिकायला मिळणार आहे. कारण यातील प्रत्येक धड्यामध्ये १० जर्मन शब्द त्यांच्या उच्चारासाहित देण्यात आले आहे. यामुळे मुले निश्चितच जर्मन भाषा शिकण्यास प्रोत्साहित होतील. ’’

संस्थेतर्फे २०२० मध्ये या उपक्रमाची सुरवात करण्यात आली होती. सुरवातीला केवळ जर्मन आणि इंग्रजी अशा दोनच भाषांमध्ये ह्या विद्यापीठातील व्याख्याने उपलब्ध होती. मात्र त्यानंतर भारतीय प्रादेशिक भाषेतही या उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार हिंदीमध्ये या आधीच हा उपक्रम सुरु करण्यात आला असून, आता मराठीतही तो सुरु करण्यात आला आहे. लवकरच तमिळ आणि कन्नड भाषेतही हा उपक्रम सुरु केला जाणार आहे. जर्मन आणि इंग्रजी भाषेत राबविण्यात आलेल्या उपक्रमाला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळाला. २०२० सालापासून आतापर्यत तब्बल ३४,५५४ विदयार्थ्यानी या उपक्रमाला भेट देत, विविध अभ्यासक्रम पूर्ण केले आहे. यामध्ये सर्वाधिक प्रतिसाद हा महाराष्ट्रातून मिळाला आहे. ग्योथं इन्स्टिट्यूट तर्फे भारताबरोबरच इराण, पाकिस्तान, बांग्लादेश, श्रीलंका या देशांमध्येही हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे दाबके यांनी सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: