fbpx

नंदकिशोर कल्चरल सोसायटी च्या वतीने गुरुपौर्णिमा साजरी


पुणे, : नंदकिशोर कल्चरल सोसायटी ची बहारदार गुरुपौर्णिमा नामवंत नृत्य संस्था नंदकिशोर कल्चरल सोसायटी च्या वतीने यमुनानगर, निगडी येथे गुरुपौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. गुरुपौर्णिमा सोहळा पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात आला.

प्रारंभी डाॅ.पं.नंदकिशोर कपोते यांनी आपले गुरू पं.बिरजूमहाराज यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन केले. त्यानंतर संस्थेच्या विद्यार्थ्यांनी गुरू डाॅ.पं.नंदकिशोर यांचे पारंपारिक पद्धतीने पाद्यपूजन केले. या वेळी सर्व आजी व माजी विद्यार्थी उपस्थित होते. नंतर नृत्य कार्यक्रमास सुरुवात झाली.या कार्यक्रमाचे वैशिष्ठ्य म्हणजे सर्व विद्यार्थ्यांनी स्वत: नृत्यरचना बसवून त्या नृत्यरचना गुरूदक्षिणे च्या स्वरूपात आपले गुरू डाॅ.पं.नंदकिशोर कपोते यांना अर्पण केल्या. विद्यार्थ्यांनी कथक नृत्यातील विविध प्रकार तत्कार, आमद, तोडे- तुकडे, परण, गतनिकास,कवित्त, लडी याशिवाय गुरूवंदना, दशावतार, अर्धांग इ.सादर केले.

कार्यक्रमात भावना सामंत, रूतुजा साळवे,प्रिन्सी ओझा, अनुष्का सामंत, प्रज्ञा शिंदे, मैथीली तावडे, अधीश्री गायकवाड, आरोही कोथावडे सह ५० विद्यार्थिनींनी भाग घेतला. कार्यक्रमाच्या अखेरीस स्वत: डाॅ.पं.नंदकिशोर यांनी कथकनृत्य सादर करुन सर्वांना मंत्रमुग्ध केले. डाॅ.कपोते यांनी नामदेवांचा अभंग ‘ कानडा राजा पंढरीचा ‘ यावर कथकनृत्य पेश केले. तसेच पं.बिरजूमहाराज यांनी शिकविलेल्या सुंदर बंदिशी त्यांनी सादर केल्या. संपूर्ण कार्यक्रमास साथ संगत तबला- संतोष साळवे, यश त्रिशरन, पखावज- पवन झोडगे, हार्मोनियम व गायन- हरिभाऊ असतकर, अक्षय येंडे यांनी केली. कार्यक्रमाचे निवेदन गारगी राणे, श्रद्धा रास्ते यांनी केले. करोना काळानंतर दोन वर्षांनंतर असा मोठा कार्यक्रम झाल्यामुळे पाऊस असुनही रसिकांनी मोठ्याप्रमाणात उपस्थिती लावली. संपूर्ण कार्यक्रमास रसिकांनी भरघोस प्रतिसाद दिला त्या मुळे कार्यक्रम रंगतदार झाला. 

Leave a Reply

%d bloggers like this: