Tuesday, June 16, 2026
BusinessLatest News

अमेरिकेतील टेक कंपनी ‘मॅंटिक इन्क’चे भारतात विस्ताराचे नियोजन

पुणे : मॅंटिक इन्क या अमेरिकेतील अग्रगण्य अशा ग्लोबल आयटी सोल्युशन्स कंपनीने पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे नवीन अत्याधुनिक ‘ऑफशोअर डेव्हलपमेंट सेंटर’ (ओडीसी) उघडून पूर्व भारतात आपल्या व्यावसायिक कामकाजाचा विस्तार करण्याची घोषणा केली आहे. पुण्यानंतर ‘मॅंटिक’चे हे भारतातील दुसरे ऑफशोअर कार्यालय आहे.
‘मॅंटिक’चे कोलकात्यातील कार्यालय सॉल्ट लेक सिटी, सेक्टर ५, टेक्नोपोलिस येथे सुरू झाले आहे. ‘मॅंटिक’चे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी हॅरी अय्यर, ‘मॅंटिक’चे कोलकात्यातील केंद्राचे प्रमुख व डिजिटल प्रोसेस ऑटोमेशन विभागाचे जागतिक प्रमुख शिरसेंदू सेनगुप्ता, ‘पेगासिस्टम्स’चे ‘स्ट्रॅटेजिक अलायन्स’चे संचालक आनंद झा, ‘नाबादिगंता इंडस्ट्रियल टाउनशिप अथॉरिटी’चे (एनडीआयटीए) अध्यक्ष देबाशीष सेन आणि ‘ऑफर इंडिया’चे संस्थापक कल्लोल घोष यांच्या हस्ते नवीन केंद्राचे उद्घाटन आज करण्यात आले.

मॅंटिक ही अमेरिकेतील टेक क्षेत्रातील प्रमुख कंपनी आहे. जागतिक ग्राहकांना सेवा देण्यासाठीचे कंपनीचे सर्वात मोठे ‘टॅलेंट हब’ कोलकात्यामध्ये बनवण्याची ती योजना आखत आहे. आयटी क्षेत्रातील या प्रमुख कंपनीने शहरात अगोदरपासूनच कर्मचारी भरती सुरू केली आहे, तसेच २०२३च्या अखेरपर्यंत ३०० जणांना कामावर घेण्याची योजनाही तयार केली आहे. २०२३च्या अखेरपर्यंत पुण्यातील कार्यालयातदेखील सध्याची १२० तंत्रज्ञांची संख्या वाढवून ३७० पर्यंत नेण्याचे ‘मॅंटिक’ने ठरविले आहे.

आपल्या या वाढत्या ‘टॅलेंट पूल’मध्ये भर घालण्यासाठी कंपनीने कोलकाता येथे नवोदितांचे ‘कॅम्पस हायरिंग’ करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. त्याचबरोबर, प्रतिभावंत तज्ज्ञांना आकर्षित करण्यासाठी या कंपनीने, कोविडच्या साथीच्या वेळी कामाची जी पद्धत सुरू झाली, त्या ‘वर्क फ्रॉम होम’ला महत्त्व देत त्या दृष्टीने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. ‘वर्क फ्रॉम होम रिजन’ यासाठी अनेक तंत्रज्ञ प्राधान्य देत असल्याने त्यांना आकर्षित करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.
कोलकाता येथील नवीन ऑफशोअर कार्यालयाविषयी बोलताना ‘मॅंटिक इन्क’चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हॅरी अय्यर म्हणाले, “पुण्यानंतर कोलकाता येथे आमचे दुसरे भारतीय ऑफशोअर केंद्र उघडताना आम्हाला आनंद होत आहे. ‘द सिटी ऑफ जॉय’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोलकातामध्ये भरपूर तांत्रिक प्रतिभा, उत्कृष्ट कार्यसंस्कृती आहे आणि जागतिक स्तरावर किफायतशीरपणाच्या निर्देशांकातही हे शहर उच्च स्थानावर आहे. हे निकष लक्षात घेता, आम्हाला विश्वास आहे की कोलकाता लवकरच जागतिक ग्राहकांना सेवा देण्यासाठीचे आमचे सर्वात मोठे ‘टॅलेंट हब’ होईल. ‘मॅंटिक इन्क’ ही उत्तर अमेरिका, कॅनडा आणि भारत यांसारख्या जगभरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये फॉर्च्युन १० आणि फॉर्च्युन ५०० कंपन्यांसोबत काम करणाऱ्या, सर्वात वेगाने वाढणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे. आम्ही मध्य-पूर्व आणि युरोप यांसारख्या भौगोलिक प्रदेशांमध्ये आमचा ठसा उमटविण्याचे आणि आमचे मनुष्यबळही वाढवण्याचे नियोजन केले आहे.”

‘मॅंटिक’चे कोलकात्यातील केंद्राचे प्रमुख व ‘डिजिटल प्रोसेस ऑटोमेशन’ विभागाचे जागतिक प्रमुख शिरसेंदू सेनगुप्ता म्हणाले, “भारतीय आयटी क्षेत्रात पूर्वेकडील भागातील काम करणाऱ्या लोकांची संख्या लक्षणीय आहे. या प्रदेशातील उपलब्ध प्रतिभावंताचा उपयोग करून घेणे, हे कोलकाता येथे नवीन कार्यालय स्थापन करण्याचे आमचे प्राथमिक कारण आहे. आम्ही सुरुवातीला आमच्या कोलकाता केंद्रातून डिजिटल प्रोसेस ऑटोमेशन (बीपीएम, आरपीए) आणि क्लाउड सर्व्हिसेस, सीआरएम यांबाबतची पूर्तता करू आणि पुढील काही महिन्यांत टप्प्याटप्प्याने इतर पद्धती सुरू करू.”
‘एनडीआयटीए’चे अध्यक्ष देबाशीष सेन म्हणाले, “पश्चिम बंगाल सरकारच्या वतीने आम्ही ‘मॅंटिक’चे कोलकात्यामध्ये स्वागत करतो. ‘मॅंटिक’चा येथे आणखी विस्तार करण्यासाठी आमच्याकडून आवश्यक ती सर्व मदत आम्ही देऊ. पूर्व-पश्चिम मेट्रोच्या विस्तारामुळे सेक्टर ५च्या कनेक्टिव्हिटीमध्ये लक्षणीय सुधारणा झालेली आहेच, आम्ही या भागातील पायाभूत सुविधांमध्ये आमखीही सुधारणा सातत्याने करीत आहोत. ‘बंगाल आयटी सिलिकॉन व्हॅली हब’मध्ये आमच्याकडे आधीपासूनच टीसीएस, रिलायन्स आणि अदानी यांसारख्या कंपन्या येत आहेत. कोविड साथीच्या दोन वर्षांच्या कालावधीनंतर आता उज्ज्वल भवितव्य दिसू लागले आहे.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading