fbpx

नव्या पिढीच्या कलाविष्काराने रंगली आषाढी एकादशीची संध्याकाळ

पुणे : पावसाच्या हलक्या सरींच्या साथीने, कर्णमधूर संगीताचा आनंद घेत, रविवारी एक रम्य संध्याकाळ पुणेकरांनी अनुभवली. संतूर, बासरी, तबला अशा वाद्यांच्या बहारदार वादन आणि रूप पाहता लोचनी, पंढरपूरीचा निळा, लावण्याचा पुतळा अशा अभंगांच्या सादरीकरणाने रसिक भारावले होते. आषाढी एकादशी आणि येत्या गुरुपोर्णिमेचे औचित्य साधत पुण्यातील तालानुभूती फौंडेशन आणि प्राइड ग्रुप यांच्या वतीने आजोजित ‘स्वर पर्व’ या कार्यक्रमात अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे पुढे घेवून जाणाऱ्या नव्या पिढीच्या आश्वासक कलाकारांनी आपल्या कलेच्या माध्यमातून आपल्या गुरूंना मानवंदना दिली. सदर उपक्रमाचे हे तिसरे पुष्प होते. गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात या उपक्रम सरुवात करण्यात आली.

कार्यक्रमात पंडित शिवकुमार शर्मा यांच्या शिष्य परंपरेतील उदयोन्मुख संतूर वादक निनाद दैठणकर, पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचे शिष्य सौरभ वर्तक आणि पंडित अजॉय चक्रबर्ती यांचे शिष्य मेहेर परळीकर या प्रमुख कलाकारांचा समावेश होता. त्यांना साथ लाभली ती आपल्या बहादारदार तबलावादनाने देशभरात रसिकांची मने जिंकलेल्या तरुण तबला वादक ईशान घोष, तालयोगी पंडित सुरेश तळवलकर यांचे शिष्य व प्रसिद्ध तबला वादक रोहित मुजुमदार, तन्मय देवचके यांचे शिष्य अमेय बिछु व पंडित सुरेश तळवलकर यांचे शिष्य रोहित खवले, अन्वेशा फुकन (तानपुरा), जगमित्र लिंगाडे (टाळ) यांची. यावेळी तालानुभूती फौंडेशनचे विश्वस्त सुधीर दर्भे, मृणालिनी मुजुमदार व एमआयटी विश्वशांती विद्यापीठाच्या लिबरल आर्ट्स विभागाच्या प्रमुख डॉ. प्रिती जोशी, भारती विद्यापीठाच्या परफॉर्ममिंग आर्ट्स विभगाचे प्रमुख डॉ. शारंगधर साठे यांच्या हस्ते कलाकरांचा सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रम मयूर कॉलनी कोथरूड येथील बाल शिक्षण प्रशालेच्या एमइएस सभागृहात संपन्न झाला.

कार्यक्रमाची सुरवात निनाद दैठणकर यांच्या संतूरवादनाने झाली. त्यांनी राग मधुवंती’ने वादनाची सुरवात करत रूपक, अद्धा, द्रुत तीन तालातील रचना सादर केल्या. त्यानंतर सौरभ वर्तक यांचे बासरीवादन झाले. त्यांनी राग हंसध्वनी ने आपल्या वादनाची सुरवात केली. त्यानंतर आलाप, मध्यलयात अध्दा तालातील बंदिश सादर केली. द्रुत तीन तालातील रचनेच्या सादरीकरणाने त्यांनी आपल्या वादनाचा समारोप केला. 

कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात मेहेर परळीकर आणि ईशान घोष यांनी एकत्रितपणे गायन आणि वादन सादर केले. मेहेर यांनी राग देस ‘ ने गायनाला सुरवात केली. त्यांनी रूपक आणि तीनतालातील ‘काली घटा घिर आयी ‘ ही रचना सादर केली. भजनी तालातील रूप पाहता लोचनी, पंढरपूरीचा निळा, लावण्याचा पुतळा, आता कुठे धावे मन, तुझे चरण देखिले, भेटी लागी जिवा, लागलीसे आस, वृंदावनी वेणू वाजे, हे अभंग सादर केले. पंढरीचे भूत मोठे, आल्या गेल्या झडपी वाटे या अभंगांच्या सादरीकरणाने त्यांनी कार्यक्रमाचा समारोप केला. 

Leave a Reply

%d bloggers like this: