fbpx

विशेष मुले ही कमकुवत नाही तर क्रियाशील – माजी आमदार मेधा कुलकर्णी 

पुणे : एखाद्या गोष्टीत आपण कमकुवत आहोत, याचा अर्थ आपण पूर्णपणे कमकुवत आहोत असा होत नाही. एखाद्या गोष्टीत जर आपण मागे असू तर मेंदूमध्ये दुसऱ्या केंद्रांवर ती कमी पूर्ण करून कार्यक्षमता वाढलेली असते आणि आपण दुसऱ्या कोणत्यातरी गोष्टीत पारंगत असतो. त्यामुळे दिव्यांग मुले कमकुवत नाहीत तर वेगळ्या अर्थाने क्रियाशील आहेत, असे मत माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

विद्या महामंडळ संस्थेच्या मूक-बधिर शिक्षण संशोधन व विकास केंद्राच्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन आपटे रस्त्यावरील संस्थेच्या सभागृहात करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष ॲड. अभय आपटे, कार्याध्यक्ष अ.ल.देशमुख, अश्विनी जोशी, स्वाती खरात, प्रविण कदम, ज्योत्स्ना सरदेशपांडे, तुकाराम गायकवाड, चंद्रकांत कुलकर्णी, शोभा राव, शिरीष महाजन, अनिल आठवले आदी उपस्थित होते.

यावेळी कर्णबधिर विद्यार्थ्यानी नृत्य सादर केले. तसेच मुलांनी केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन देखील मांडण्यात आले होते. संस्थेला देणगी देत सहकार्य करणा-या संस्थांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

मेधा कुलकर्णी म्हणाल्या, विद्यार्थांसाठी आयोजित शिक्षण पद्धतीमध्ये ५० टक्के भाग मनोरंजनाचा आणि ५० टक्के भाग अभ्यासक्रमाचा असावा. ज्यामुळे त्यांना शिक्षणातून आनंद घेता येईल आणि शिक्षणाची गोडी निर्माण होईल. या विशेष मुलांनी तयार केलेल्या वस्तूंचा एक कायमस्वरूपी स्टॉल करावा. त्यासाठी लागणारी शासनाची मदत मी करायला तयार आहे, असेही त्यांनी सांगितले

डॉ.अ.ल.देशमुख म्हणाले, सामाजिक बांधिलकी म्हणून संस्थेच्यावतीने या केंद्राची सुरुवात झाली असून या केंद्राला ३२ वर्षे झाली आहेत. शासन दरबारी विशेष मुलांसाठी नोकरी हा विषय फक्त परिपत्रकापूरता मर्यादित राहिला आहे. त्यामुळे स्वतःचा व्यवसाय सुरू करून त्यांना उत्पन्न कसे मिळेल, असे प्रशिक्षण संस्थेच्यावतीने त्यांनी दिले जाते, असे ही त्यांनी सांगितले.

फोटो ओळ- विद्या महामंडळ संस्थेच्या मूक-बधिर शिक्षण संशोधन व विकास केंद्राच्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन आपटे रस्त्यावरील संस्थेच्या सभागृहात करण्यात आले. यावेळी नृत्य सादरीकरण करताना कर्णबधिर मुले. उपस्थित मान्यवर.

Leave a Reply

%d bloggers like this: