सिंफनी ऑफ व्हायोलिन’ची रसिकांवर भूरळ
स्वर मल्हार महोत्सवाच्या पहिल्या दिवसाची सांगता
पुणे : एकाचवेळी सहभागी झालेले तब्बल १५ हून अधिक व्हायोलिनवादक, एकतालात वाजणारे संगीत आणि विविध रचनांच्या सादरीकरणाने उत्तरोत्तर रंगलेल्या सिंफनी ऑफ व्हायोलिन’ने रसिकांच्या मनावर भूरळ पाडली.
स्वर मल्हार या संगीत महोत्सवाच्या पहिल्या दिवसाची सांगता गझलकार जगजीत सिंग यांना संगत करणारे व्हायोलिन वादक दीपक पंडित यांच्या ‘ सिंफनी ऑफ व्हायोलिन’ या कार्यक्रमाद्वारे झाली.
कार्यक्रमात यमन आणि रागेश्री मधील स्वरचित मिश्र रचना, मांड या राजस्थानी लोकसंगीतातील ‘ केसरिया बालम ‘, बडे गुलाम अली खाँ साहेब यांची ‘याद पिया की आए ही ठुमरी ‘, ‘लोनलीनेस’ ही स्वरचित रचना सादर करण्यात आली.
संतोष मुळेकर (पियानो), गौरव वासवानी ( की – बोर्ड), स्वरांजय कुमार (हॅण्डसोनिक), प्रशांत सोनग्रा (तबला)
या कलाकारांनी यावेळी साथसंगत केली.
महोत्सवात रविवारी, दिनांक ३ जुलै रोजी तेजस व राजस उपाध्ये यांची व्हायोलिन जुगलबंदी, राहुल देशपांडे यांचे गायन होणार आहे. महोत्सवाची सांगता पंडित अतुलकुमार उपाध्ये यांच्या ‘ ऑर्केस्ट्रा ऑफ व्हायोलिन ‘ या कार्यक्रमाने होणार आहे. यामध्ये व्हायोलिन अकॅडमीचे ३५ हून अधिक विद्यार्थी सहभागी होतील.
