बंडखोर आमदारांची माझ्या डोळ्याला डोळा भिडवण्याची हिंमत नाही – आदित्य ठाकरे
मुंबई : विधीमंडळात आल्यानंतर शिवसेनेतील एकही बंडखोर आमदार माझ्या डोळ्याला डोळा भिडवू शकत नव्हता, असे वक्तव्य आमदार आदित्य ठाकरे यांनी केले. मी किंवा माझ्यासोबत असलेल्या शिवसेना आमदारांच्या नजरेला नजर देण्याची हिंमत बंडखोर करत नव्हते. मग ते आपल्या मतदारसंघात जाऊन शिवसैनिकांना कशाप्रकारे सामोरे जाणार आहेत, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. रविवारी आणि सोमवारी विधानसभेचे विशेष अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. त्यापैकी आजच्या दिवशी नव्या विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात आली. त्यानंतर सभागृहाचे कामकाज उद्यापर्यंत तहकूब करण्यात आले.
सभागृहातून बाहेर पडल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, बंडखोर आमदारांपैकी एकही जण माझ्या नजरेला नजर भिडवू शकत नव्हता. इकडे त्यांची ही अवस्था आहे, तर ते आपल्या मतदारसंघात गेल्यानंतर शिवसैनिकांना कसे सामोरे जाणार आहेत. आता या बंडखोर आमदारांना सुरक्षाव्यवस्थेसह बसमधून नेले जाते. पण हे किती दिवस चालणार? आज हे सर्वजण नैतिकतेच्या चाचणीत अपयशी ठरले आहेत, असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले.
