Thursday, June 18, 2026
Latest NewsPUNE

साईटसेव्हर्स’चे पुण्यात मोबाइल व्हिजन सेंटर सुरू

पुणे :  साईटसेव्हर्स इंडियाने ‘अमृत दृष्टी’ या आपल्या नेत्र आरोग्य कार्यक्रमाचा एक भाग म्हणून,पुण्यात मोबाइल व्हिजन सेंटरची स्थापना केली आहे. हा कार्यक्रम एच. व्ही .देसाई नेत्र रुग्णालय द्वारे राबविण्यात येत असून त्याला स्टेट बँक ऑफ इंडिया कॅपिटल मार्केट्स लिमिटेडचे पाठबळ लाभले आहे. पुणे शहरातील प्राथमिक नेत्र आरोग्य सेवा सुधारण्यासाठी हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. या अंतर्गत नेत्र तपासणीसाठी सुसज्ज मोबाइल व्हॅन पुण्यातील झोपडपट्ट्यांमधील लोकांपर्यंत पोहोचेल आणि त्यांना सर्वसमावेशक नेत्रसेवा प्रदान करेल. विशेषतः महिला, वृद्ध आणि मुले अशा दुर्लक्षित गटासाठी ही सेवा दिली जाणार आहे.

शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये डोळ्यांच्या आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण करणे, उपचार घेण्यासाठी प्रोत्साहन देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. साईटसेव्हर्स इंडियाचे मानद अध्यक्ष आणि माजी मुख्य निवडणूक आयुक्त डॉ. एस.वाय. कुरैशी आणि फोर्ब्स मार्शल लि.च्या संचालक आणि साईटसेव्हर्स इंडियाच्या मानद उपाध्यक्ष रती फोर्ब्स यांनी या मोबाईल व्हॅन्सना हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. या वेळी साईटसेव्हर्स इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आर. एन. मोहंती आणि संपूर्ण विश्वस्त मंडळ उपस्थित होते.

साइटसेव्हर्सच्या वतीने देशातील महानगरांमधील झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना डोळ्यांच्या आरोग्याबाबत तपासणी, उपचार आदी सर्वसमावेशक अणि शाश्वत सुविधा पुरवण्यासाठी ‘अमृता दृष्टी’हा राष्ट्रीय पातळीवरील कार्यक्रम राबवला जातो. देशातील आठ राज्यांच्या राजधान्यांसह २० शहरांमध्ये नेत्र आरोग्य सेवा देण्याच्यादृष्टीने काम सुरू आहे.

“साइटसेव्हर्सचा अमृता दृष्टी कार्यक्रम झोपडपट्ट्यांमध्ये वाजवी दरात डोळ्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक सेवा   प्रदान करतो. प्राथमिक आरोग्य केंद्रे, दवाखाने, रुग्णालये यांसारख्या सरकारी सुविधांमध्ये डोळ्यांच्या आरोग्यविषयक सेवा कमी प्रमाणात असतात किंवा काही ठिकाणा त्या नसतातच.अशा परिस्थितीत मोबाइल आय हेल्थ व्हॅन स्ट्रॅटेजी हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा एक उत्कृष्ट मार्ग आहे,  असे डॉ. एस. वाय. कुरैशी, म्हणाले.

“लोकांची याबाबतीतल्या अडचणी, आव्हाने दूर करण्याची क्षमता निर्माण करण्यासाठी अशा सेवा समाजात उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.  जिथे सर्वांत जास्त गरज आहे अशा समुदायापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जातो. टाळता येण्याजोगे अंधत्व टाळण्यासाठी या कार्यक्रमाचा निश्चितच उपयोग होत आहे,” असे रती फोर्ब्स म्हणाल्या.

“२०११च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार, पुण्याच्या एकूण लोकसंख्येपैकी जवळपास २२ टक्के लोक झोपडपट्ट्यांमध्ये राहतात.  पुणे महानगरपालिकेच्या आकडेवारीनुसार, शहरात ४८१ झोपडपट्ट्या आहेत. तिथल्या लोकांसाठी ही सुविधा अत्यंत लाभदायी ठरेल,” असे आर एन मोहंती म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading