पात्र असूनही हक्काचे रेशन नाकारल्यामुळे लोकायत नागरी समिती मार्फत अन्नधान्य वितरण अधिकारी,पुणे यांना निवेदन
पुणे : नाना पेठ, वडारवाडी, जुनी वडारवाडी मधील नागरिकांच्या प्रलंबित रेशन प्रश्नाबाबत अन्नधान्य वितरण अधिकारी सुरेखा माने यांना लोकायत नागरी समितीच्या कार्यकर्त्यांनी निवेदन दिले.
अन्न सुरक्षा कायद्या २०१३ नुसार नियमापेक्षा कमी मिळत असलेल्या रेशन बाबत, पात्र असूनही नागरिकांचे बंद झालेले रेशन तसेच परिमंडळ अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा संदर्भात नागरी समितीचे निमंत्रक ॲड. मोनाली च. अपर्णा यांनी माहिती दिली.
यावेळी हक्काच रेशन समाजातील गरजू नागरिकांना मिळवून देण्यासाठी लोकायत नागरी समिती करत असलेल्या रेशन साक्षरता अभियानाच महत्वही अंगमेहनती कष्टकरी संघर्ष समितीचे निमंत्रक व कष्टकऱ्यांचे नेते नितीन पवार यांनी सांगितले.
अन्नधान्य वितरण अधिकारी सुरेखा माने यांनी तात्काळ ‘ब’,’क’,’ल’ च्या परिमंडळ अधिकाऱ्यांशी बोलून पात्र नागरिकांना लवकरात लवकर रेशन सुरू करण्याबाबत सूचना दिल्या. तसेच गरजू लोकांना रेशन मिळवून देण्याच्या समितीच्या प्रयत्नाचे कौतुकही केले. शिष्टमंडळात नाना पेठ व वडारवाडीतील कार्यकर्तेही उपस्थित होते.
