कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेली स्मार्ट सिटी पीए यंत्रणा अडगळीत, ही यंत्रणा पुन्हा कार्यान्वित करण्याची आम आदमी पक्षाची मागणी
पुणे:केंद्र सरकार प्रणित महत्वाकांक्षी योजना स्मार्ट सिटी अंतर्गत पुणे महापालिकेने कोट्यावधी रुपये खर्च करून नागरिकांना सावध करू शकणारी पीए – पब्लिक ऍड्रेस यंत्रणा पुणे शहरात उभारली होती. आपत्ती व्यवस्थापन, संकटकाळी तात्काळ संदेशवहन या हेतूने ही यंत्रणा उभारली गेली होती, परंतु ढिम्म प्रशासन, भ्रष्ट सत्ताधारी यांच्या निष्क्रियतेमुळे ही यंत्रणा वापराविना पडून आहे. कोरोना काळातील अपवाद वगळता या यंत्रणेचा वापर झाल्याचे निदर्शनास आलेले नाही.
शहरातील १३६ चौकात असलेली ही यंत्रणा नीट प्रभावीपणे वापरल्यास याचा विविध कामांसाठी मोठ्या प्रमाणावर उपयोग होऊ शकतो.
“पब्लिक ऍड्रेस सिस्टीम ही शहरातील शाळा, इमारती, कार्यालये, सार्वजनिक ठिकाणे ई. साठी अत्यंत उपयोगी यंत्रणा आहे. याचा महत्वाचा उद्देश आहे की सार्वजनिक घोषणा करणे अथवा संदेश देणे तसेच महत्वाचे म्हणजे संकटकाळी तात्काळ निर्वासन करणे. या यंत्रणेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला असतो जसे अँपलिफायर, मायक्रोफोन, स्पीकर इत्यादी जेणेकरुन योग्य आवाजाच्या पातळीवर सार्वजनिक ठिकाणी संदेशवहन करणे सहज होईल. पुणे मनपाकडे ही यंत्रणा असूनही अडगळीत पडून आहे हे अत्यंत दुर्दैवी आणि भ्रष्ट यंत्रणेचे लक्षण आहे. अशी टीकाविजय कुंभार, आप राज्य संघटक यांनी केली आहे.
