नरेंद्र मोदींच्या कर्तृत्वात अगणित लघुपट निर्मितीची ताकद – चंद्रकांत पाटील
पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे कर्तृत्व इतके मोठे आहे की; त्यांच्या कर्तृत्वावर अगणित लघुपट निर्माण होऊ शकतात, असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठच्यावतीने आयोजित ‘कर्मयोगी नमो’ लघुपट स्पर्धेतील विजेत्यांचा रविवारी मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, अभिनेते प्रशांत दामले, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, मानसी मागीकर, आरोह वेलणकर, भाजपा शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, सांस्कृतिक आघाडीचे प्रदेश संयोजक ॲड. शैलेश गोजमगुंडे, प्रदेश प्रभारी लक्ष्मण सावजी, पुनीत जोशी, शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर आदी उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांचे कर्तृत्व इतके मोठे आहे की; त्यावर अगणित लघुपट निर्माण होऊ शकतात. कोविड आणि त्यानंतरच्या काळातील मोदीजींच्या अनेक निर्णयांमुळे देशाचा संपूर्ण जगात नावलौकिक वाढला. कोविडनंतर रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे संपूर्ण जगाला इंधन टंचाईचा सामना करावा लागला. त्यातून आपल्या शेजारील पाकिस्तानसह अनेक देशांचे अर्थचक्र कोलमडले. पण माननीय मोदीजींच्या कणखर नेतृत्वामुळे देशवासियांना इंधन टंचाई किंवा महागाईच्या झळा सहन कराव्या लागल्या नाहीत.
भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठच्यावतीने आयोजित ‘कर्मयोगी नमो’ लघुपट स्पर्धेत १३ स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यापैकी अमरावतीच्या संज्ञा मीडिया प्रकाशन, रंगशाळा निर्मित आणि धनंजय कानबाळे दिग्दर्शित राष्ट्रीय संरक्षणावर आधारित ‘दोन कप चहा’ या लघुपटास प्रथम पुरस्काराने गौरविण्यात आले. ७५ हजार रुपयाचा धनादेश, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. तर पनवेलच्या सत्यधर्मा प्रोडक्शने स्वच्छ भारत विषयावरील ‘सेल्फी पॉईंट’चा द्वितीय आणि मुंबईच्या यामिनी पटेल दिग्दर्शित ‘अक्षरण मोदी’ या लघुपटास तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. त्यातील द्वितीय क्रमांक विजेत्यांना ५१ हजार रुपये स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र; तर तृतीय क्रमांक विजेत्यांना ३१ हजार रुपये स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात आले. उमेश घळसासी यांनी उपस्थितांचे आभार मानले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल दामले यांनी केले.
