शिवजींचे शिष्यत्व मिळणे हे माझे सात जन्माचे पुण्य : पंडित सतीश व्यास
पुणे : शिवजी तबलावादनात निपुण होते; पण वडिलांच्या आग्रहाखातर शिवजींनी संतूर हाती घेतले आणि संतूरवादनात अत्युच्च शिखर गाठले. शिवजींच्या संतूरवादनाला आध्यात्मिक बैठक होती त्यामुळे त्यांचे वादन स्वर्गीय असायचे. अशा महान कलाकाराच्या सन्निध्यात 47 वर्षे शिष्य म्हणून राहण्याचा योग आला हे माझे सात जन्माचे पुण्य समजतो, अशा भावना पंद्मविभूषण पंडित शिवकुमार शर्मा यांचे ज्येष्ठ शिष्य विख्यात संतूरवादक, पद्मश्री पंडित सतीश व्यास यांनी व्यक्त केल्या.
भारतीय शास्त्रीय संगीत, नृत्यादी कलांविषयी युवा वर्गात रुची निर्माण करण्यासाठी तसेच युवा कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असलेल्या ऋत्विक फाउंडेशनतर्फे ऋत्विक फाउंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस् येथे जगविख्यात संतूरवादक पद्मविभूषण पंडित शिवकुमार शर्मा यांच्या स्मृतिप्रित्यर्थ पंडित व्यास यांच्या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी रसिकांशी संवाद साधताना गुरू-शिष्य नात्यातील आठवणींचा पट उलगडला. पंडित व्यास यांच्याशी फाउंडेशनचे संचालक सुदीप्तो मर्जित यांनी संवाद साधला.
पद्मभूषण सी. आर. व्यास यांचे आपण पुत्र, घरातच गाणे असताना आपण संतूर वादनाकडे कसे वळलात या प्रश्नाला उत्तर देताना पंडित सतीश व्यास म्हणाले, वयाच्या 13व्या वर्षी शिवजींची मैफल ऐकण्याचा योग आला. रंगमंचाचा पडदा उघडताच शिवजींचे झालेले प्रफुल्लीत दर्शन आणि संतूर हे आगळेवेगळे वाद्य पाहून मी प्रभावित झालो. मुंबईत झालेली ही मैफल दोन-अडिच तास रंगली. मैफल ऐकल्यानंतर वडिलांकडे संतूर शिकण्याचा आग्रह धरला. त्यावेळी वडिलांनी आधी गाणे शिक, शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण कर त्यानंतर संतूर वादनाचे प्रशिक्षण घे असे सांगितले. पदवी, पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर जवळ जवळ नऊ वर्षांनी संतूर शिक्षणाची परवानगी पुन्हा वडिलांकडे मागितली. वडिल आणि शिवजींची विमानप्रवासात भेट झाली त्यावेळी वडिलांनी माझ्या संतूर वादनाच्या ओढीबद्दल शिवजींना सांगितले. त्यावेळी शिवजींनी तात्काळ मला शिष्य करून घेण्यास होकार दिला. त्यानंतर सुरू झाला तो संतूरवादनाचा प्रवास. शिवजींनी 1975 साली दिलेले संतूर आजही माझ्या वादनात आहे, असे त्यांनी मोठ्या गौरवाने सांगितले.
शिवजींच्या व्यक्तिचित्रणाविषयी विचारले असता पंडित व्यास म्हणाले, शिवजी गंभीर प्रकृतीचे होते, सहसा कोणात मिसळत नसत पण पंडित हरिप्रसाद चौरसिया, उस्ताद झाकिर हुसेन अशा कलाकारांच्या सहवासात गप्पांवेळी ते खुलत असत त्या वेळी त्यांच्या उत्तम विनोदबुद्धीचे दर्शन होई.
सुरुवातीच्या काळात शिवजींच्या संतूरवादनाकडे रसिक आकृष्ट होत नव्हते त्यावेळी मूळ संतूर वाद्यातील रचनेत बदल करत संतूरवादनाची स्वत:ची एक वैशिष्ट्यपूर्ण शैली शिवजींनी निर्माण केली. या नंतर शिवजींचे वादन रसिकमान्य होत गेले. देशातच नव्हे तर विदेशातही त्यांच्या वादनाचे चाहते निर्माण झाले.
पुण्यातील ओशो आश्रमातील झालेल्या मैफलीची आठवण सांगताता ते म्हणाले, सव्वा ते दीड तास चाललेल्या मैफलीत शिवजींनी राग जोगकंस सादर केला. साथीला उस्ताद झाकिर हुसेन होते. या मैफलीत शिवजींची ब्रह्मानंदी टाळी लागली. संपूर्ण वातावरण शिवजींच्या वादनाने भारून गेले होते. त्यावेळी माझ्यासह रसिकांना स्वर्गीय रसामृताची अनुभूती आली. शिवजींसमवेत साथीला अनेक तबलावादक असत पण झाकिरभाईंच्या साथीने त्यांचे वादन अधिकच खुलायचे.
कलाकार म्हणून शिवजींची काही तत्त्वे होती ती त्यांनी कटाक्षाने पाळली, पण गुरू म्हणून ती तत्त्वे त्यांनी शिष्यांवर कधी लादली नाहीत, हे त्यांचे वेगळेपण म्हणावे लागेल.
‘मिया मल्हार‘ने रंगली मैफल
संवाद कार्यक्रमानंतर पंडित सतीश व्यास यांची संतूरवादनाची मैफल रंगली. ‘मिया मल्हार‘ या रागाने त्यांनी वादनास सुरुवात केली. यात झपताल, मध्यलय आणि द्रुत सादर केले. मैफलीची सांगता शिवजींच्या आवडत्या ‘किरवाणी‘ या रागाने केली. पंडित व्यास यांना ओजस आढीया (तबला) यांनी समर्पक साथ केली. सुमारे दीडतास चालेलेल्या मैफलीत रसिक तल्लीन झाले होते.
कलावंताचे स्वागत करून फाउंडेशनच्या उपक्रमांची माहिती संस्थापक प्रवीण कडले यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता पुरंदरे यांनी केले.
