निर्मलवारीमुळे वारीच्या स्वरूपात परिवर्तन

पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, समितीचे विश्वस्त ह.भ.प शिवाजी महाराज मोरे यांचे मत

पुणे – दिवसेंदिवस वारी मध्ये वाढणाऱ्या भक्तांच्या संख्येमुळे अनेक समस्या येत होत्या. त्यातील मुख्य समस्या म्हणजे वाढणारे घाणीचे साम्राज्य आणि त्यामुळे येणाऱ्या अडचणी सन२०१६ साली सुरू केलेल्या निर्मलवारीमुळे केवळ स्वच्छताच नाही तर अस्वच्छतेमुळे होणारे आजारही थांबले. त्यामुळे आता केवळ २५ टक्के औषधांचा वापर होत आहे. निर्मलवारीमुळे वारीचे स्वरूप बदलले आहे, असे मत पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, समितीचे विश्वस्त ह.भ.प.शिवाजी महाराज मोरे यांनी व्यक्त केले.

विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या वतीने आषाढी वारीच्या चारही मार्गांवर पायी चालणाऱ्या वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य सेवा पुरवली जाते. या आषाढी वारी आरोग्यसेवेचा शुभारंभ कर्वे रस्त्याजवळील धोंडू मामा साठे होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज येथे करण्यात आला. यावेळी ह.भ.प. नारायण महाराज गंबरे, विश्व हिंदू परिषदचे प्रांत सहमंत्री अ‍ॅड. सतीश गोरडे, विश्व हिंदू परिषदचे प्रांत सेवा प्रमुख तुषार कुलकर्णी, संजय कुलकर्णी, नागनाथ बोंगरगे, कृष्णकांत चांडक, डॉ. सौरभ आंबपकर आदी उपस्थित होते. या आरोग्य सेवा पथकाबरोबर १० रुग्णवाहिका, ३० डॉक्टर्स, ३० नर्सेस, २५ सेवाभावी कार्यकर्ते सेवा देणार आहेत.

नारायण महाराज गंबरे म्हणाले, पांडूरंगाच्या भेटीसाठी अनेक भक्त वारीमध्ये येतात आणि पायी प्रवास करतात. या भक्तांना पांडुरंगाचे दर्शन घेतल्यानंतर जितका आनंद त्यांना होतो, त्यापेक्षा जास्त त्यांची वारकऱ्यांची सेवा करणा-यांना होतो, असेही त्यांनी सांगितले.

तुषार कुलकर्णी म्हणाले, विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांतच्यावतीने गेल्या ३० वर्षांपासून आषाढी वारीच्या मार्गांवर पायी चालणाऱ्या वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य सेवा पुरवली जाते. ही सेवा अंखड व अविरत सुरू आहे. लाखो भाविक या सेवेचा लाभ घेत असतात. सन २०१९ मध्ये सुमारे दिड लाख वारकऱ्यांनी या सेवेचा लाभ घेतला, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: