‘बंडखोर आमदारांना मुंबईला यावंच लागेल’, शरद पवारांचा इशारा
मुंबई : . शिवसेनेविरोधात बंड पुकारुन गुवाहाटीला गेलेल्या बंडखोर आमदारांना मुंबईला यावंच लागेल, आमदारांना परिणाम भोगावे लागतील, असा इशारा राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष आणि महाविकास आघाडी सरकारचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिला. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बंडखोर आमदारांमागे भाजपचा हात नाही, असं विधान केलं आहे. यावर शरद पवारांनी एकनाथ शिंदे यांच्या व्हिडीओचा दाखला देत राष्ट्रीय पक्षांची यादीच वाचट सध्याच्या या राजकीय घडामोडींमागे भाजपच असल्याचे सांगितले.
शरद पवार म्हणाले, “बंडखोर आमदारांची निधी न मिळण्याबाबतचा आरोप हे वस्तूस्थितीला धरुन नाही. त्यांनी जो निर्णय घेतला आहे तो कायद्याविरोधात आहे. त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. त्यांनी मतदारसंघाचं फक्त कारण दिलं. छगन भुजबळ यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर त्यांच्यासोबत 12 ते 15 जण होती. त्यानंतर जी निवडणूक झाली होती त्यामध्ये एक-दोन जण सोडला तर बाकी सर्वांचा पराभव झाला होता, असा महाराष्ट्रातला अनुभव आहे. त्यामुळे जे लोक आता आसामला गेले आहेत त्यांच्यासोबत तसंच होऊ शकतं. त्यासाठी त्यांनी आपल्या मतदारांना निधीचा मुद्दा सांगितला आहे”, असं शरद पवार म्हणाले.
“अजित पवारांनी महाराष्ट्रातील मुंबईची स्थिती पाहून विधान केलं असावं. इथून प्रत्यक्ष लोक हलवणं आणि ऑपरेशन करणं यामध्ये एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी दिसत आहेत. अजित पवारांना इतकी माहिती जरुर आहे. पण गुजरात आणि आसाम इथली परिस्थिती आम्हाला अधिक माहिती. एकनाथ शिंदे यांनी एका राष्ट्रीय पक्षाचा पाठिंबा असल्याचं विधान केलं आहे. माझ्याकडे सर्व राष्ट्रीय पक्षांची यादी आहे. यामध्ये भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, टीएमसी, कम्युनिस्ट पार्टी, सीपीएन ही सहा अधिकृत पक्षांची यादी आहे. या सगळ्यांचा यात हात आहे का? जे नाहीत याचा विचार केला तर कोण आहे हे सांगण्याची आवश्यकता नाही”, असं शरद पवार म्हणाले.