fbpx
Monday, June 17, 2024
ENTERTAINMENTLatest News

अविनाशच्या भूमिकेमुळे जबाबदारी वाढली – निखिल राजेशिर्के

माझी तुझी रेशीमगाठ हि मालिका आता एका रंजक वळणावर आली आहे. मालिकेत नुकतंच प्रेक्षकांनी यश आणि नेहाचा दिमाखदार विवाह सोहळा पाहिला. त्या दोघांच्या सुखी संसाराला सुरुवात होतच असताना अविनाश नावाचं वादळ त्यांच्या आयुष्यात आलं आहे. अविनाश हा नेहाचा पहिला पती असून त्याची भूमिका अभिनेता निखिल राजेशिर्के साकारतोय. त्यांच्यासोबत साधलेला हा खास संवाद
१. तुझ्या भूमिकेबद्दल काय सांगशील?
– परीचा बाबा कोण असेल? याबाबत सिरीअल सुरू झाल्यापासूनच प्रेक्षकांना उत्सुकता होती, तशीच ती मलाही होती आणि ही भूमिका करण्याची संधी मला मिळावी अशी मनोमन इच्छाही होती आणि म्हणतात ना , “अगर किसी चीज को दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिष मे लग जाती हैं” या उक्तीप्रमाणे अजय मयेकर, सुनील भोसले आणि झी मराठी यांच्या एकमताने ही भूमिका माझ्या वाट्याला आली म्हणून आनंद आणि जबाबदारी वाढली आहे.
२. मालिकेत अविनाशच्या येण्याने काय वळण येणार आहे?
– आत्तापर्यंत या मालिकेला खूप यश मिळालं आहे. माझी नकारात्मक भूमिका आहे. त्यामुळे परीचा बाबा परीशी कसा वागतो? नेहाचा नवरा नेहाशी कसा वागतो? तो यशला त्रास देणार का? त्याचं मालिकेतील इतर पात्रांशी काय गणित आहे? असे अनेक ट्विस्ट अँड टर्न  मालिकेत पुढे हळूहळू उलगडतील.
३. लोकप्रिय मालिकेत एका विशिष्ट वळणावर एंट्री करताना काही दडपण होत का?
– ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका रंजक वळणावर आली आहे, मालिकेत परीच्या बाबाची एन्ट्री झाली आहे, नेहासाठी आणि प्रेक्षकांसाठीही हे धक्कादायक वळण आहे. कारण नेहा आणि यशचं नुकतंच लग्न झालं आहे आणि आत्ता कुठे या दोघांचा संसार सुरू झालेला असतानाच हे अविनाश नावाचं  वादळ त्यांच्या संसारात डोकाऊ पहातंय. या अशा रंजक वळणावर एन्ट्री करताना रंगभूमीवर प्रयोग सुरू व्हायच्या आधी कलाकारांच्या मनात जी धाकधूक होती तशीच धाकधूक अविनाश साकारतानाही होत आहे, परंतु सहकलाकार व तंत्रज्ञांच्या सहकार्यामुळे दडपण असं नाही.
४. या भूमिकेसाठी काही खास तयारी केली का?

– मला अभिनय करायला आवडतं आणि  वेगवेगळ्या भूमिका करण्याचं भाग्य मला लाभलं. अविनाशची भूमिका साकारताना खास तयारी म्हणाल तर त्याची व्यक्तीरेखा ही मुख्यत्वे परीला आवडेल अशी हवी आणि इतरांना त्याची चीड आणि त्रास होईल अशी साकारावी लागेल अशा अनेक मुद्द्यांवर मार्गदर्शन मालिकेचे दिग्दर्शक अजय मयेकर यांच्याकडून नेहमीच होत आहे. बाकी अविनाशच्या दिसण्याबाबत वेगळेपण व विशेष लकबी असण्यासाठी इतर भूमिकांप्रमाणे मी विचार करून काम करतोय‌.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading