Wednesday, June 3, 2026
Latest NewsPUNE

विशेष मुलांची सेवा ही समाजसेवेची तपस्या आमदार सिद्धार्थ शिरोळे यांचे प्रतिपादन

पुणे : दिव्यांग मुलांच्या विकासाला मर्यादा आहेत. अशा मुलांच्या घरातील वातावरण देखील वेगळे असते. त्यामुळे घरातील वातावरण व शाळेतील शिक्षण याचा समतोल राखत विशेष मुलांची सेवा शिक्षक करतात. या कार्याची किंमत होवू शकत नाही. विशेष मुलांची सेवा ही ख-या अर्थाने समाजसेवेची तपस्या आहे, असे प्रतिपादन आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केले.

भारतीय जनता पक्ष आणि सुनील पांडे यांच्या वतीने भांडारकर रस्त्यावरील सुह्रद मंडळ संचलित बधिर मूक शिक्षण केंद्रातील मुलांना वह्यांची भेट देण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रसिद्ध कायदेतज्ञ अ‍ॅड.अभय आपटे, भाजपा पुणे शहर सरचिटणीस दत्तात्रय खाडे, आयोजक सुनील पांडे-लोहगांवकर, रविंद्र साळेगावकर, गणेश पगारे, प्रतुल जागडे, ओंकार केदारी, अपूर्व खाडे, निलेश घोडके, मिलिंद टकले, प्रकाश सोळंकी, सौरभ पुंडलिक यांसह संस्थेच्या मानद सचिव डॉ.वासंती देशपांडे, अनुया नाईक, अर्पणा चक्रदेव आदी उपस्थित होते. आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

सिद्धार्थ शिरोळे म्हणाले, दिव्यांग मुलांसाठी कार्य करणा-यांची संख्या व कार्याची व्याप्ती वाढवायला हवी. दिव्यांग मुलांना त्यांची स्वप्ने व्यक्त करण्याची संधी मिळायला हवी. ते स्वप्न कोणतेही असो, आपण त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहायला हवे. तर त्यांच्या पंखांना ख-या अर्थाने बळ मिळेल.

अ‍ॅड.अभय आपटे म्हणाले, कोणतेही संकट असले, तरी देखील प्रतिकूल परिस्थितीत कशा प्रकारे पुढे जाता येते, हे दिव्यांग व विशेष मुलांचे हास्य आपल्याला शिकविते. ही मुले विशेष नाहीत, तर वेगळ्या प्रकारे सक्षम आहेत. एकाग्रती, चिकाटी ही सामान्यांकडे जेवढया प्रमाणात नाही, त्यापेक्षा जास्त या मुलांकडे असते. त्यामुळे त्यांना समाजाच्या मुख्य आणण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असेही त्यांनी सांगितले. प्राचार्य विकास पाटोळे यांनी प्रास्ताविक केले. जयश्री नाईक यांनी सूत्रसंचालन केले. शिवकुमार श्रीरामवार यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading