पालखी सोहळ्यातील ज्येष्ठ नागरिकांना लसीचा बूस्टर डोस महापालिकेने 20 ठिकाणी केली औषधोपचाराची सुविधा
पुणे : पालखी सोहळ्यादरम्यान शहरात २० ठिकाणी वारकर्यांना औषधोपचाराची सुविधा करण्यात येणार असून याठिकाणी ६० वर्षांवरील वारकर्यांना कोरोनावरील लसीचा बूस्टर डोस देण्यात येईल. तसेच शहरातील शाळांमध्ये १२ वर्षांवरील मुलांसाठी शाळांच्या मागणीनुसार लसीकरणाचे कॅम्पही भरविण्यात येतील, अशी माहिती महापालिका आयुक्त व प्रशासक विक्रम कुमार यांनी दिली.
आषाढी वारीनिमित्त पुढील आठवड्यात शहरात संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालख्या येणार आहेत. पालखी मार्गावर तसेच मुक्कांमांच्या ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतेसोबतच पाणी व आवश्यक त्या सुविधा पुरविण्यात येणार आहेत. त्यादृष्टीने तयारीही करण्यात येत आहे. पालखी सोहळ्यादरम्यान वारकर्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने २० ठिकाणी औषधोपचारांची सुविधा करण्यात येणार आहे. याठिकाणी ६० वर्षांवरील वारकर्यांना कोरोनावरील लसीचा मोफत बूस्टर डोसही देण्यात येणार आहे. बूस्टर डोससाठी वारकर्यांनी आधार कार्ड आणि दोन डोस घेतल्याचे सर्टीफिकेट सोबत ठेवल्यास लसीकरणाची प्रक्रिया अधिक सोपी होईल. असे आवाहनही कुमार यांनी केले आहे.
कोरोना पॉझीटीव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. आज नवीन १९३ पॉझीटीव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ४ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उर्वरीत सर्व रुग्णांना सौम्य लक्षणे असून घरीच उपचार घेत आहेत. लहान मुलांना कोरोनाची लागण होण्यापासून रोखण्यासाठी लसीकरण वाढविण्यात येणार आहे. प्रामुख्याने १२ वर्षावरील शालेय मुलांचे लसीकरण करण्यासाठी शाळांमध्येच लसीकरण शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी शाळांकडून आलेल्या मागणीनुसार वेळापत्रकाचे नियोजन करण्यात येईल, असे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी नमूद केले.