Wednesday, June 3, 2026
Latest NewsPUNE

आयुष्याची भाग्यरेषा आपणच आखायला हवी – फत्तेचंद रांका

पुणे : यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या यशस्वी व्यक्तींनी स्वत:चे जग शून्यातून निर्माण केले. केवळ पुस्तकी ज्ञानाच्या जोरावर नव्हे, तर व्यवहारिक ज्ञान देखील आत्मसात करुन त्यांनी ही वाटचाल केली. त्यामुळे आपण कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असलो, तरी देखील आयुष्याची भाग्यरेक्षा आपणच आखून त्यावर वाटचाल करायला शिकले पाहिजे, असे मत पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी व्यक्त केले

रोटरी क्लब आॅफ पूना मिडटाऊनतर्फे व्यावसायिक सर्वोत्तम गुणवत्ता पुरस्कार २०२१-२२ प्रदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी क्लबचे अध्यक्ष पराग सुरा, सचिव सुरज पाषाणकर, संचालक धनंजय काळे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. जोशी वडेवाले चे संस्थापक शैलेश जोशी व पूना शिम्स प्रा. लि. चे व्यवस्थापकीय संचालक सचिन गुप्ते यांना पुरस्काराने गौरविण्यात आले. मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप होते.

फत्तेचंद रांका म्हणाले, तरुणांना आज कोणतीही गोष्ट सांगायला किंवा शिकवायला गेले, तर ते पुरावा मागतात. पुराव्याप्रमाणेच पूर्वजांचे संस्कार देखील महत्वाचे आहे. पूर्वजांनी सांगितलेल्या गोष्टींमध्ये देखील तथ्य आहे. त्यावरच अनेकजण आजमितीस वाटचाल करुन यशस्वी झाले आहेत. तरुणांना देखील यशस्वी व्हायचे असेल, तर त्यांनी तसे उद्दिष्ट समोर ठेवायला हवे. नकारात्मकता दूर ठेऊन नवनवीन संकल्पना राबविणे गरजेचे आहे.

पुरस्काराला उत्तर देताना सचिन गुप्ते म्हणाले, आई-वडिल आणि शिक्षकांनी केलेले संस्कार न विसरता ते आचरणात आणण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करायला हवा. नियमानुसार व नैतिकतेनुसार व्यवसाय किंवा कोणतेही काम करायचे ठरविल्यास ते शक्य आहे. मात्र, त्याकरीता जिद्द आणि चिकाटी गरजेची आहे. सरळ व्यवसाय केला तरी देखील त्यात फायदाच होतो.

पराग सुरा म्हणाले, रोटरी क्लब आॅफ पूना मिडटाऊन हा ५२ वर्षे जुना क्लब आहे. नदीवर बंधारे बांधून पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देणे, विशेष मुलांसाठी बस व्यवस्था, कामासाठी मशिन, डायलिसीस मशिन उपलब्ध करुन देण्याचे काम क्लबने अनेक ठिकाणी केले आहे. ग्रामीण भागातील शाळा नूतनीकरण व तेथील सोयी-सुविधांची पूर्तता करण्यावर भर देणार आहे. आपापल्या क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्याबद्दल या व्यवसायिकांना पुरस्काराने गौरविण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. प्रतिभा कर्णिक यांनी मानपत्रांचे वाचन केले. शोभा कमलाकर यांनी सूत्रसंचालन केले. सुरज पाषाणकर यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading