Wednesday, June 3, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

माझ्या वाढदिवशी कोणीही भेटायला येऊ नये – राज ठाकरेंचे आवाहन

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हिप बोनवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे ते आवश्यक ती काळजी घेत आहेत. या दरम्यान, राज ठाकरे यांचा १४ जूनला वाढदिवस आहे. या अनुषंगाने राज यांनी त्यांच्या तमाम महाराष्ट्र नवनिर्माण सैनिकांना एक आवाहन केलं आहे. राज ठाकरे यांनी ट्विटरवर एका ऑडियो क्लिपच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सैनिकांना संबोधित करताना त्यांनी म्हटले आहे की, माझ्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. पण कोरोनाच्या एका डेड सेल मुळे ती शस्त्रक्रिया नियोजित वेळी करता आली नाही. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी १०-१५ दिवस घरात क्वारंटाइन राहिलो आहे. आता पुढील आठवड्यात ही शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. मात्र याच दरम्यान, येत्या मंगळवारी (१४ जून) माझा वाढदिवस आहे. या वाढदिवशी दरवर्षी अनेक महाराष्ट्र सैनिक मला भेटतात. त्यातून त्यांना आणि मलाही समाधान मिळतं. पण या वर्षी मात्र मला वाढदिवशी कोणीही भेटायला येऊ नये, कारण मला कोणालाच भेटता येणार नाही.

माझ्या शस्त्रक्रियेला आधीच विलंब झाला आहे. जर या वाढदिवशी बाहेरून काही लोक मला भेटले आणि त्यांच्याशी माझा संपर्क आल्याने पुन्हा कोविड किंवा काही त्रास झाला तर पुन्हा ही शस्त्रक्रिया लांबवावी लागेल. त्यामुळे यंदा कोणीही मला भेटायला येऊ नका. कारण शस्त्रक्रिया किती काळ लांबवायची यालाही मर्यादा आहेत. आपण सारे जिथे आहात तिथेच राहा आणि शुभेच्छा द्या. शस्त्रक्रियेनंतर मी तुम्हा सर्वांना निश्चित भेटेन. पण सध्या मी कुठल्याही प्रकारचा धोका पत्करू इच्छित नाही, त्यामुळे १४ तारखेला वाढदिवशी मी कोणालाही न भेटण्याचा निर्णय केला आहे, अशी घोषणा राज यांनी ट्वीटवरून केली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading