Wednesday, June 3, 2026
Latest NewsPUNE

भ्रष्ट कूलसचिवांवर कारवाई करण्याच्या आश्वासनानंतर आपचे आंदोलन मागे

विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेसमोर दोन्ही विषय मांडणार असल्याचे प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांचे लेखी आश्वासन


पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची मुख्य इमारत बंदिस्त करण्याचे काम तातडीने थांबवावे व भ्रष्ट कुलसचिवांना सक्तीच्या रजेवर पाठवावे, विद्यापीठ अपहार निधीची वसुली करावी आदी मागण्यांसाठी विद्यापीठामध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात दीपक जाधव, आम आदमी पक्षाचे प्रवक्ते डॉ अभिजित मोरे, आपचे रोहन रोकडे, ॲड दत्तात्रय भांगे, निलेश वांजळे, अक्षय शिंदे, ॲड आशिष ताम्हाणे तसेच आजी-माजी विद्यार्थी अभ्यास गटाचे सतीश पवार, श्रीकांत मिश्रा, सुरेश देवढे, महावीर साबळे, अनिल गायकवाड, कमलाकर शेटे आदी उपस्थित होते.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इमारत आवारात विद्यार्थी व नागरीकांनी येऊ नये म्हणून हा परिसर बंदिस्त करण्याचे काम काल अचानक सुरु केले होते. हे काम पूर्ण बेकायदेशीर आहे. तसेच पुणे महापालिकेने देखील यापूर्वीच या कामाला स्थगिती दिली असून देखील काल संध्याकाळी अचानक पुणे विद्यापीठ कूलसचिवांकडून विद्यापीठाची मुख्य इमारत बंदिस्त करण्याचे काम सुरु केले. ही बातमी समजताच आम आदमी पक्ष आणि आजी-माजी विद्यार्थी अभ्यास गटाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी सदर बांधकाम तात्काळ थांबवावे यासाठी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू केले.

दरम्यान, यापूर्वीही असे प्रयत्न झाले होते. त्यावेळी विद्यार्थी संघटनांच्या आंदोलनाच्या दबावानंतर हे काम रद्द केल्याचे तत्कालीन कुलगुरू डॉ करमळकर यांनी विद्यार्थी संघटनांना सांगितले होते. तरीदेखील काल अचानक पुन्हा काम सुरू करण्यात आले होते. पण ठिय्या आंदोलनानंतर प्र- कुलगुरु डॉ सोनवणे यांच्या आदेशानंतर हे काम थांबवण्यात आले.

कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी बेकायदेशीरपणे दरमहा 50 हजार रूपयांची वेतनवाढ तीन वर्षे घेतल्याचे पत्र उच्च शिक्षण विभागाने विद्यापीठाला पाठवले आहे. विद्यापीठ कायद्यानुसार विद्यापीठ फंडाचा गैरवापर करणे हा गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.

यावेळी प्र-कुलगुरू डॉ. सोनवणे यांच्याशी आंदोलकांनी चर्चा केली. त्यानंतर विद्यापीठाची मुख्य इमारत बेकायदेशीररीत्या बंदिस्त करणाऱ्या व विद्यापीठ निधीचा वैयक्तिक वेतनवाढीसाठी अपहार करणाऱ्या भ्रष्ट कुल सचिवांवर कारवाई करणार. तसेच पुढील व्यवस्थापन परिषदेमध्ये याबाबत निर्णय घेणार असे लेखी उत्तर डॉ. सोनवणे यांनी आंदोलकांना दिलयांवर आंदोलन मागे घेण्यात आले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading