Monday, June 15, 2026
Latest NewsMAHARASHTRASportsTOP NEWS

खेलो इंडिया युथ गेम्स 2022 : लॉन टेनिसमध्ये महाराष्ट्राच्या आकांक्षा निठुरेने पटकावले सुवर्णपदक

पंचकुला चौथ्या खेलो इंडिया युथ गेम्समध्ये पहिल्या क्रमांकासाठी महाराष्ट्र आणि हरियानात मोठी चुरस आहे. एकेका सुवर्णपदकासाठी काट्याची लढाई सुरू आहे. लॉन टेनिसमध्ये सकाळीच महाराष्ट्राच्या वैष्णवी आडकरने (पुणे) कांस्य पदक पटकावले. कडाक्याच्या उन्हात झालेल्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या आकांक्षा निठुरेने कर्नाटकच्या सुहिथा मयुरीचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. हा अंतिम सामना अत्यंत अटीतटीचा झाला. आकांक्षाने तीन सेटमध्ये (६-७, ७-६ व ६-४) हा सामना जिंकला. पंचकुलातील जिमखाना मैदानावर ही चुरशीची लढत झाली.

मानसिक पाठबळ

एकेरीत सुवर्णपदक पटकावणारी आकांक्षा ही नवी मुंबईतील एएसए अकादमीत सराव करते. प्रशिक्षक अरूण भोसले यांच्यासोबत महाराष्ट्राचे क्रीडा विभागाचे सहसंचालक चंद्रकांत कांबळे, ओएसडी व्यंकेश्वर, खो-खोचे प्रशिक्षक उदय पवार यांनी सामन्यास उपस्थित राहून आकांक्षाला प्रोत्साहन दिले. ती पिछाडीवर असतानाही मानसिक बळ देण्याचे काम केले. क्रीडा मंत्री सुनील केदार व आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनीही शुभेच्छा देत उत्साह वाढवला.

एकेरीत सहज कांस्य

मुलींच्या एकेरीत महाराष्ट्राला कांस्यपदक सहजपणे पदक मिळाले. पुण्याच्या वैष्णवी आडकर आणि हरियानाच्या श्रृती अहलावत यांच्यात कांस्य पदकासाठी सामना होता. परंतु या सामन्यात श्रृती गैरहजर राहिली. त्यामुळे वैष्णवी कांस्यपदकाची मानकरी ठरली.

सायकलिंगमध्ये रौप्य, टेटेमध्ये मुली फायनलमध्ये

रोड सायकलिंगमध्ये मास स्टार्ट प्रकारात सिद्धेश पाटीलने रौप्यपदक पटकावले. तो पुणे येथील क्रीडा प्रबोधिनीचा खेळाडू आहे. टेबल टेनिसमध्येही मुलींनी महाराष्ट्राचा हरियानात डंका वाजवला आहे. त्यांचा अंतिम सामना सायंकाळी सहा वाजता हरियानासोबत होणार आहे. दिया चितळे व स्वस्तिका घोष (दोघीही मंबई) या हरियानाच्या सुहाना सैनी व चक्रवर्ती यांच्यासोबत लढतील. या सामन्यात आपले रौप्यपदक पक्के झाले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading