fbpx
Friday, April 19, 2024
Latest NewsPUNE

इंडियाआशा फौंडेशनतर्फे सुजाता बोरकर यांची उत्तर पश्चिम महाराष्ट्र शाखेच्या कार्यकारी संचालकपदी नियुक्ती 

पुणे  :   शिक्षण, आरोग्य व सामाजिक कल्याण या क्षेत्रात भारतातील अनेक राज्यात ना नफा तत्वावर काम करणाऱ्या इंडियाआशा फौंडेशन या सामाजिक संस्थेने सामाजिक क्षेत्रातील अनुभवी व्यक्ति सुजाता बोरकर यांची उत्तर पश्चिम महाराष्ट्र शाखेच्या कार्यकारी संचालकपदी नियुक्ती केल्याची घोषणा केली.

बोरकर यांनी दोन दशकाहून अधिक काळापासून तळागाळातील विविध सामाजिक समस्या हाताळण्याचे काम केले असून एक दशकाहून अधिक काळापासून त्या इंडियाआशा फौंडेशनसोबत काम करत आहे. त्यांची सामाजिक बदलाची आवड लक्षात घेऊन इंडिया आशा फौंडेशनने अनेक प्रभावशाली सामाजिक उपक्रम सकारात्मसक परिणामांसह सुरु केले.

सुजाता बोरकर यांच्या उत्तर पश्चिम महाराष्ट्र शाखेच्या कार्यकारी संचालकपदी झालेल्या नेमणुकीमुळे इंडिया आशा फोंडेशनतर्फे अनेक सामाजिक उपक्रम कोरोना महामारीच्या व्यत्ययानंतर पुन्हा नव्या जोमाने सुरु होत आहेत.

” आरोग्य, शिक्षण आणि तत्सम क्षेत्रामध्ये मूलभूत काम करणाऱ्या इंडिया आशा फौंडेशनच्या उत्तर पश्चिम महाराष्ट्र शाखेच्या कार्यकारी संचालकपदी नेमणूक होणे हा माझा सन्मान आहे. अनेक राज्यातील ग्रामीण व आदिवासी भागातील समाज जीवनावर आमच्या या प्रयत्नांनी सखोल परिणाम झाला आहे. तरुणांसाठी कौशल्य विकसन तसेच ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांसाठी अध्ययन अक्षमतेवर मात करणारे उपक्रम आम्ही राबवतो याचा आम्हास अभिमान आहे. कार्यक्षम कार्यकर्त्यांचा समूह व त्यास लाभलेले उत्साहवर्धक वातावरण यामुळे इंडिया आशा फौंडेशन वंचितांची आवडीने, काळजीपूर्वक सेवा करण्याचा प्रयत्न करत आहे.”  असे बोरकर म्हणाल्या. कोरोना महामारीच्या आघाताने आलेल्या व्यत्ययामुळे थांबलेले अनेक सामाजिक उपक्रम संस्थेतर्फे पुन्हा सुरु करण्यात येत आहे असेही त्या म्हणाल्या.

कोरोना महामारीमुळे जागतिक स्तरावर कामकाज थांबले त्यास भारत देशही अपवाद नाही. तरीसुद्धा आम्ही जोमाने सामाजिक उपक्रमांची सुरुवात करत आहोत. ग्रामीण आणि आदिवासी भागातील मुलांच्या व्यक्तिमत्व विकासासह अध्ययन अक्षमतेवर मात करण्याचे ध्येय उराशी बाळगून आम्ही काम करणार आहोत. कोविडमुळे सुरु असलेले  शाळेतील विद्यार्थ्यांच्या गळतीचे  प्रमाण कमी करून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम करणार आहोत असेही बोरकर यांनी सांगितले.

सन २००१ मध्ये स्थापन झालेले इंडिया आशा फौंडेशन ग्रामीण आणि आदिवासी भागातील लोकांचे जनजीवन सुधारण्यासाठी अथकपणे कार्यरत आहे. गेल्या दोन दशकांपासून शिक्षण, आरोग्य, नागरी कर्तव्ये , समाजकारण या क्षेत्रात संस्था काम करत असून ग्रामीण व आदिवासी भागातील नागरिकांचे शाश्वत जीवन सुधारण्यासाठी प्रसार करत आहे.

शैक्षणिक क्षेत्राचा विचार करता महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी सूक्ष्म कौशल्य विकसन कार्यशाळा, उत्तम करिअर देणारे संगणक प्रशिक्षण वर्ग इंडिया आशाच्या इंडिया प्रकल्पाच्या माध्यमातून देत आहे.  विद्यार्थ्यांमधील कल्पकता व संशोधक वृत्ती शोधून नाविन्यपूर्ण आविष्कार निर्माण करण्यासाठी प्रशिक्षणाचे काम संस्थेच्या डॉ ऐपीजे अब्दुल कलाम सेन्टरने केले आहे.

इंडिया आशा फौंडेशनचा शार्प [ स्कुल अँड होम अप्लिकेबल रेमेडिअल प्रोग्रॅम ] हा एक प्रमुख प्रकल्प गेल्या सात वर्षांपासून सुरु आहे. उपचारात्मक प्रशिक्षण देऊन शालेय विद्यार्थ्यांमधील अध्ययन अक्षमतेवर मात करण्याचे काम शार्प प्रकल्पाद्वारे केले जाते. आजवर शार्पद्वारे दरवर्षी सरासरी १५ शाळांमधून, सरासरी १५ प्रशिक्षकांच्या माध्यमातून ५६१३ तासांचे प्रशिक्षण, सहभागी ५३७९ विद्यार्थ्यांना दिले. त्यापैकी ३१७९ विद्यार्थी अंतिम परीक्षा उत्तीर्ण होऊन शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सामील झाले.

आरोग्य सेवा क्षेत्रात एड्स जागरूकता मोहीम, रक्तगट तपासणी, पोषक आहाराविषयी समुपदेशन इ. उपक्रम इंडिया आशा फौंडेशनने राबविले आहेत. नागरी कर्तव्ये अंतर्गत फौंडेशनने पर्यावरण जागृती कार्यक्रम, मतदान अधिकार ‘ नो टू ब्राईब ‘ असे कार्यक्रम हाताळले आहेत. साहित्य, कला व सांस्कृतिक विषयाच्या कार्यक्रमांची आखणी संस्थेतर्फे केली जाते. नवीन कलाकारांनी तयार केलेल्या पुस्तकांचा प्रसार , ज्ञानवर्धक लेख असलेले मासिक इ.उपक्रम संस्थेतर्फे चालवले जातात.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading