Wednesday, June 3, 2026
Latest NewsPUNE

जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेतील विद्यार्थ्यांमध्ये १२ वी च्या निकालात मुलींची बाजी

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट संचलित जय गणेश ज्ञानवर्धन अभियानांतर्गत जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेमधील इयत्ता बारावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. योजनेंतर्गत स.प.महाविद्यालयामध्ये कला शाखेत शिकणारी रिया ओसवाल ही ८७.८३ टक्के गुण मिळवून प्रथम आली आहे.

जय गणेश पालकत्व योजनेतील आणखी २ विद्यार्थ्यांनी ८० टक्के पेक्षा पुढे गुण मिळविले असून ४ विद्यार्थ्यांनी ७० टक्के पेक्षा जास्त गुण मिळविले आहेत. वाणिज्य शाखेत १0, विज्ञान शाखेत ४, कला शाखेत १ आणि व्होकेशनलमध्ये २ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
दादावाला ज्यु. कॉलेजमधील शिव सरवदे याला ८७.५० टक्के, गरवारे महाविद्यालयातील वैष्णवी चितळे हिला ८१.८३ टक्के गुण मिळाले आहेत. याशिवाय रिशिका पासकंठी, सिद्धी शितोळे, श्रद्धा चिन्नी, रुचिता धायगावे यांना ७० टक्के पेक्षा अधिक आणि सिद्धार्थ दहिभाते, अक्षया साळुंके यांना ६० टक्के पेक्षा अधिक गुण मिळाले आहेत.

रिया ओसवाल हिचे वडिल रिपेअरिंगचे काम करीत असून आई गृहिणी आहे. रियाला पुढे मानसशास्त्र शिकायचे असून ती त्यादृष्टीने तयारी करीत आहे. तर, दुसरा आलेला शिव सरवदे याला बीबीए किंवा बीसीए चे शिक्षण घ्यायची इच्छा आहे.

इयत्ता १० वी आणि १२ वी हे प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील महत्त्वाचे टप्पे असतात. त्यामुळे याकाळात त्यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहून योग्य दिशा दाखविणे आणि मार्गदर्शन व मदत करणे आवश्यक असते. यादृष्टीने जय गणेश ज्ञानवर्धन अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकरिता कार्य सुरु आहे. सन २०१० पासून विद्यार्थी पालकत्व योजना ट्रस्टच्या वतीने सुरु आहे. इयत्ता १२ वी मध्ये उत्तम यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचे विश्वस्तांनी अभिनंदन केले असून यापुढेही विद्यार्थ्यांना मदत देण्यास ट्रस्ट तत्पर असेल, असे ट्रस्टतर्फे सांगण्यात आले.

*फोटो ओळ : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट संचलित जय गणेश ज्ञानवर्धन अभियानांतर्गत जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेमधील इयत्ता बारावीचा निकाल शंभर टक्के लागला. त्यातील यशस्वी विद्यार्थीनी रिया ओसवाल, शिव सरवदे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading