Wednesday, June 3, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

प्रत्येक महाविद्यालयात स्वराज्यध्वज उभारला जाईल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

पुणे : जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या गगनभेदी जयघोषात, रणशिंगाच्या ललकारीत, मर्दानी खेळाच्या चित्तथरारात आणि ढोलताशांच्या गजरात एसएसपीएमएस संस्थेच्या प्रांगणातील शिवरायांच्या विश्वातील पहिल्या स्मारकाचा परिसर दणाणून गेला. निमीत्त होते, शिवजयंती महोत्सव समिती आयोजित शिवस्वराज्य दिन सोहळ्याचे. यानिमित्ताने ५१ फूट स्वराज्यगुढी उभारण्यात आली. सोहळ्याचे हे सलग १० वे वर्षे होते.

यावेळी महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, श्रीमंत मालोजीराजे छत्रपती, टीम सरसेनापती हंबीररावचे प्रवीण तरडे, संदीप पाटील, सौजन्य निकम, सार्वजनिक शिवस्वराज्य दिनाचे प्रवर्तक समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड आणि सर्व स्वराज्यघराणी, स्वराज्यबांधव उपस्थित होते. उदय सामंत व उपस्थित माताभगिनी यांच्या हस्ते भगव्या स्वराज्यध्वजा सह शिवशक राजदंड स्वराज्यगुढीचे विधीवत पुजन करुन ५१ फूट स्वराज्यगुढी उभारण्यात आली.

उदय सामंत म्हणाले, पुढील वर्षीपासून प्रत्येक महाविद्यालयामध्ये स्वराज्य ध्वज उभारला जाईल. हा कोणत्याही राजकीय पक्षाचा ध्वज नाही. शिवरायांच्या या स्वराज्य ध्वजातून प्रत्येक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल. याबद्दलचा शासकीय अध्यादेश लवकरच काढला जाईल. याशिवाय ज्याप्रमाणे रायगडावर शिवराज्याभिषेक दिन साजरा होतो. त्याप्रमाणे दरवर्षी विविध गड-किल्ल्यांवर शासनातर्फे मोठे सोहळे साजरे केले जातील. आपण सर्वांनीच शिवरायांचा आणि त्यांच्या कार्याचा आदर्श घ्यायला हवा, असेही त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, शिवरायांनी स्वत:चा शक म्हणजेच शिवशक प्रारंभ करुन राजदंड हाती घेत सर्व प्रस्थापित सत्ता पालथ्या करुन स्वराज्याचा सार्वभौम पवित्र सुवर्ण कलश रयतेच्या झोळी मध्ये रिता केला. रयतेची झोळी सुखसमृध्दी, स्वातंत्र्य, समतेने भरली. रयतेचे पालनपोषण करणारे सार्वभौम छत्रपती झाले. त्यामुळे आजही शिवरायांचे स्वराज्य हे भारतीयांच्या मनावर राज्य करते.

अमित गायकवाड म्हणाले, शिवराज्याभिषेक दिन भारताच्या इतिहासाला कलाटणी देणारा अतिशय महत्वाचा दिवस आहे. त्यामुळेच ६ जून शिवस्वराज्य दिन विश्वव्यापी होण्यासाठी आम्ही ६ जून २०१३ साला पासून शिवरायांचा जिरेटोप, सुवर्णहोन, जगदंब तलवार, वाघनखे, शिवमुद्रा या पंच स्वराज्य चिन्हांनी अलंकृत भगव्या स्वराज्यध्वजा सह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी प्रत्येक गडावर, घरावर, चौकात, गावात, शहरात, राज्यात तसेच देशविदेशात उभारुन साजरा करत आहोत. पुण्यामध्ये दरवर्षी लालमहाल, एसएसपीएमएस येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, छत्रपती संभाजी महाराज स्मारक डेक्कन, शनिवारवाडा यांसह अनेक ठिकाणी स्वराज्य गुढी उभारली जाते. त्याच बरोबरीने यावर्षी ५१ गडांवर तसेच पुण्यातील १०१ गणेशोत्सव मंडळानी देखील स्वराज्यगुढी उभारुन शिवस्वराज्य दिन साजरा केला.

कार्यक्रमाचे आयोजन समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड, रवींद्र कंक, समीर जाधवराव, किरण साळी, सचिन पायगुडे, निलेश जेधे, शंकर कडू, प्रवीण गायकवाड, गोपी पवार, सागर पवार, मयुरेश दळवी, किरण देसाई यांसह असंख्य स्वराजबांधवांनी केले होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading