बालेवाडीच्या विद्यार्थ्यांनी केला प्रदूषणमुक्त परिवहनाचा निश्चय
पर्यावरण जागृतीसाठी पुणे मेट्रो लाईन ३ ची प्रभातफेरी
पुणे : हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावरील पुणे मेट्रो लाईन ३ च्या वतीने आज (शनिवारी) बालेवाडी येथे एका विशेष प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले होते. भविष्यकालीन परिवहनाचे ठळक साधन असलेल्या तसेच प्रदूषणमुक्त परीवहनाला उत्तेजन देणाऱ्या मेट्रो रेल्वेची आणि देशाचे भविष्य ज्यांच्या हातात आहे, अशा विद्यार्थ्यांची एकमेकांशी सांगड घालून द्यावी हा या प्रभातफेरीच्या आयोजनामागचा मुख्य उद्देश होता.
यावेळी पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आलोक कपूर, पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडच्या संचालक नेहा पंडीत आणि पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडचे प्रकल्प संचालक अक्षय शर्मा उपस्थित होते. तसेच बालेवाडी येथील एसकेपी कॅम्पसचे सचिव सागर बालवडकर हे कार्यक्रमाचे विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होते.
बालेवाडीच्या साई चौक येथून निघून हाय स्ट्रीटमार्गे पार पडलेल्या या प्रभातफेरीमध्ये पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडचे कर्मचारी आणि टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेडच्या कर्मचाऱ्यांनी भाग घेतला. तसेच बालेवाडी येथील सी एम इंटरनॅशनल स्कूलचे शिक्षक आणि विद्यार्थी यावेळी पर्यावरणविषयक जागृती करणारे विविध फलक हातात घेऊन या प्रभातफेरीमध्ये सहभागी झाले होते. यावेळी या विद्यार्थ्यांनी स्वच्छ परिसर आणि प्रदूषणमुक्त परिवहन यांची सदैव कास धरण्याचा निश्चय जाहीर केला. प्रभातफेरी पार पडल्यानंतर विद्यार्थ्यांकरीता पर्यावरण विषयक सांस्कृतिक कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होते.
पुणे मेट्रो लाईन ३ बाबत माहिती:
पुणे मेट्रो लाईन ३ हा हिंजवडीच्या आयटी हबला शिवाजीनगरच्या मध्यवर्ती केंद्राशी जोडणारा २३ किमीचा उन्नत मेट्रो रेल्वे प्रकल्प आहे. हा सार्वजनिक खाजगी भागीदारी (PPP) प्रकल्प आहे, जो पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) द्वारे टाटा समूहाच्या ट्रिल अर्बन ट्रान्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड (TUTPL) आणि सिमेन्स प्रोजेक्ट व्हेंचर्स (Siemens Project Ventures GmbH) यांचा समावेश असलेल्या कन्सोर्टियमला प्रदान करण्यात आला आहे. हा प्रकल्प डिझाईन, बिल्ड, फायनान्स, ऑपरेट आणि ट्रान्सफर (DBFOT) तत्त्वावर पुणे आयटीसिटी मेट्रो रेल लिमिटेड या विशेष उद्देश कंपनी द्वारे ३५ वर्षांच्या सवलतीच्या कालावधीसाठी विकसित आणि ऑपरेट केला जाणार आहे.
