चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळेंबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे आंदोलन
पुणे : सुप्रिया ताई आगे बढो हम तुम्हारे साथ है, या चंपाचं करायचं काय खाली डोकं वर पाय, सुप्रिया ताई अंगार है बाकी सब भंगार है, अशी घोषणाबाजी करत पुण्यातील सारसबाग येथे अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यासमोर चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी महिला पदाधिकाऱ्यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाला राष्ट्रवादीचे नेत्या रूपाली चाकणकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहर महिला अध्यक्ष मृणाल वाणी, रुपाली पाटील ठोंबरे, कविता मारणे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहर महिला युवती अध्यक्ष सीमा सातपुते, व महिला पदाधिकारी व कार्यकत्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळेंबाबत केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यात आला आहे.
रूपाली चाकणकर म्हणाल्या,भाजपने काढलेल्या मोर्च्यात बोलताना भाजपच्या चंद्रकांत पाटलांनी खासदार सुप्रिया सुळेंवर तीव्र शब्दांत टीका केली होती. ‘कशासाठी राजकारणात राहता, घरी जा घरी, स्वयंपाक करा. खासदार आहात ना तुम्ही, कळत नाही एका मुख्यमंत्र्याची भेट कशी घ्यायची असते? कळत नाही एक शिष्टमंडळ पाठवायचं? आता घरी जाण्याची वेळ आली आहे. एवढेच नाही, तर तुम्ही दिल्लीत जा, नाही तर मसनात जा, शोध घ्या आणि आरक्षण द्या, असे म्हणाले होते. हे केलेले वक्तव्य चुकीचे आहे. याचा आम्ही निषेध करत आहोत. चंद्रकांत पाटील यांनी माफी मागितली पाहिजे. चंद्रकांत पाटील यांनी सुप्रियाताई बद्दल परत अशी भाषा केली तर आम्ही त्यांना चौप दिल्याशिवाय राहणार नाही .असा इशाराही रूपाली चाकणकर यांनी दिला.
