Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

पाचगांव पर्वती वन आराखड्याचा निधी वनीकरणासाठीच – आमदार माधुरी मिसाळ

पुणे : पाचगांव पर्वती वन आराखड्यासाठी मंजूर करून आणलेला १३ कोटी रुपयांच्या निधीचा विनियोग वनीकरणासाठीच केला जाईल, वन विभागाने या ठिकाणी कॉंक्रिटिकरण किंवा सुशोभिकरणाचा प्रयत्न केला तर तो हाणून पाडू असा इशारा आमदार माधुरी मिसाळ यांनी दिला.

मिसाळ यांनी आज सकाळी तळजाई टेकडी वनक्षेत्रांत (पाचगांव पर्वती) भेट देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. वन विभागाचे अधिकारी दीपक पवार, प्रदीप संकपाल, माजी नगरसेवक महेश वाबळे, साईदिशा माने, श्रीकांत जगताप, पर्वती भाजपचे अध्यक्ष जितेंद्र पोळेकर, सरचिटणीस प्रशांत दिवेकर, शैलेश देशपांडे, विश्वास ननावरे, सहकार नगर नागरीक मंचच्या तळजाई बचाव अभियानाचे अमित अभ्यंकर, पुरुषोत्तम दुरवास यांची प्रमुख उपस्थिती होती.

आमदार मिसाळ म्हणाल्या, पाचगांव पर्वती वनक्षेत्राच्या वनीकरणासाठी १३ कोटी रुपयांचा निधी मी पाठपुरावा करून मिळविला. या निधीतून टेकडीवर कॉंक्रिटिकरण आणि सुशोभिकरणाच्या कामांचा शुभारंभ वन विभागाने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते केला. स्थानिक आमदार या नात्याने मला विश्वासात घेतले गेले नाही. गेली अनेक वर्षे या टेकडीवर वन संपदेचे संरक्षण आणि संवर्धनासाठी आम्ही नागरिकांसह प्रयत्न करीत आहोत. या नागरिकांमध्ये वन विभागाच्या प्रकल्पाबाबत प्रचंड नाराजीची भावना आहे. उपलब्ध निधीतून परिसरात मियावाकी वन, बांबू वन, उंच रोपवन या स्वरूपाची कामे केली जातील. केवळ परदेशी झाडांच्या जागेवर स्थानिक प्रजातींची झाडे लावण्यात येणार आहेत. येत्या पावसाळ्यात टेकडीवर मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. कॉंक्रिटिकरण किंवा सुशोभीकरणाचा प्रयत्न झाल्यास तो हाणून पाडू.

मिसाळ पुढे म्हणाल्या, मेट्रोने टेकडीवर पुनर्रोपण केलेले वृक्षांची वाताहात झाली आहे. वन विभाग आणि मेट्रोने त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. विविध खात्यांमध्ये समन्वयाचा अभाव आहे. यासाठी पुढील आठवड्यात महापालिकेचे अधिकारी, वन विभागाचे अधिकारी आणि मेट्रोचे अधिकारी यांच्या एकत्रित बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading