ईश्वराची एकरुप होण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे संगीत : पं.केशव गिंडे
२१ वा ब्रम्हनादसंगीत महोत्सव उत्साहात साजरा
पुणे : ईश्वराची एकरुप होण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे संगीत असे मत पं.केशव गिंडे यांनी व्यक्त केले.
ब्रह्मनाद कला मंडळ व धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आणि संस्कार भारती पुणेच्या सहाय्याने नुकताच आयोजीत २१ वा ब्रह्मनाद संगीत महोत्सवात गिंडे यांच्या हस्ते पं.शिवदास देगलूरकर यांना ब्रह्मनाद पुरस्कार यांना देण्यात आला, त्यावेळी गिंडे बोलत होते.
या कार्यक्रमाला विश्व हिंदू प्रचारक दादा वेदक, शाहिर हेमंत मावळे, प्राचार्या रश्मी शुक्ला, नरेंद्र चिपळूणकर, मिलिंद तुळाणकर, राजेश दातार, डॉ.विकास कशाळकर, पं.पांडुरंग मुखडे. शीला देशपांडे, राजेंद्र कुलकर्णी, ह भ प आजेगावकर महाराज,अनिकेत चव्हाण,किशोर पोकळे, सारंग नवले आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन ब्रह्मनाद संगीत महाविद्यालयाने केले होते. यावेळी उत्कृष्ट सामाजिक कार्याबद्दल सोपान उर्फ काकासाहेब चव्हाण आणि सांगीतिक कार्याबद्दल पं.संजय गरुड व रागिणी गरुड यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.
पं.केशव गिंडे त्यांच्या मनोगतात म्हणाले, स्वर आणि सूर ही एक प्रकारची पूजा च आहे.सातत्य, साधना आणि समर्पण या त्रिसूत्रीच्या जोरावर आपण संगीतात उच्चतम स्थान प्राप्त करु शकतो.
पं.शिवदास देगलूरकर यांनी यावेळी थोडक्यात मनोगत व्यक्त केले.
महोत्सवाची सुरुवात उमेश गडे यांच्या संघाने केलेल्या शंखनादाने करण्यात आली. सकाळी सात वाजता सुरू झालेला स्वरयज्ञ रात्री साडेदहा पर्यंत सुरू राहिला. १५ तास चाललेल्या या महोत्सवात सुमारे 200 नवोदित व दिग्गज कलाकारांनी सहभाग घेतला होता.
लहान मोठ्या अनेक कलाकारांनी गायन, वादन, नृत्याच्या सादरीकरणातून गेल्या दोन वर्षात दिवंगत झालेल्या कलाकारांना संगीतमय श्रद्धांजली अर्पण केली.यामध्ये उर्वशी शहा, रेखा हेगडे कर्नाटक, मेघा बासू कलकत्ता, साईनाथ राऊत, स्मिता देशमुख यांनी शास्त्रीय गायन सादर केले.कार्यक्रमाचा समारोप ब्रह्मनाद कला मंडळाचे संस्थापक -अध्यक्ष सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक पं. संजय गरुड यांच्या गायनाने झाला.
कार्यक्रमाला किशोर कोरडे,विनायक गुरव,सुरेश फडतरे, उपेंद्र सहस्त्रबुद्धे, प्रकाश बेहरे आदी कलाकारांनी उत्कृष्ट साथसंगत केली.रसिक श्रोत्यांनी या महोत्सवाला मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून दाद दिली.
