Wednesday, June 3, 2026
Latest NewsPUNE

ग्रिप्स नाट्य महोत्सवाला शनिवारी होणार सुरुवात

पुणे : कला आणि सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या पुणे शहरात यंदा पुन्हा एकदा ‘ग्रिप्स नाट्य महोत्सव’ रंगणार आहे. रेनबो अम्ब्रेला फाउंडेशन आणि महर्षी कर्वे स्री शिक्षण संस्थेच्या स्कूल ऑफ मीडिया अँड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने ७ ते २२ मे दरम्यान या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महर्षी कर्वे स्री शिक्षण संस्थेच्या कर्वेनगर येथील आवारात हा महोत्सव आजपासून (७ मे) सुरू होणार असून ६ ते १४ वयोगटातील मुला-मुलींना यात सहभाग घेता येणार आहे. यात दुपारी ३ वाजता विविध कार्यशाळा, त्यानंतर संध्याकाळी ५ ते ७ वाजेपर्यंतच्या मौजमेळ्यात मनोरंजन आणि करमणुकीचे कार्यक्रम होतील आणि संध्याकाळी ७ वाजता नाटकाचे प्रयोग होतील.

या महोत्सवामध्ये श्रीरंग गोडबोले लिखित आणि संकेत पारखे दिग्दर्शित ‘छान छोटे, वाईट्ट मोठे’, श्रीरंग गोडबोले लिखित आणि पौर्णिमा मनोहर दिग्दर्शित ‘नको रे बाबा’, विभावरी देशपांडे लिखित आणि दिग्दर्शित ‘प्रोजेक्ट अदिती’ आणि विभावरी देशपांडे लिखित आणि राधिका इंगळे दिग्दर्शित ‘एकदा काय झालं’ या नाटकांचे प्रयोग होणार आहेत. कर्वेनगर येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या रमा पुरुषोत्तम संकुलात दररोज सायंकाळी ७ ते रात्री ८.३० या वेळेत ही नाटके सादर केली जातील. तर ६ ते १४ वयोगटातील मुलांसाठी नाटकांव्यतिरिक्त कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये अभिनय, नृत्य, पपेट शो आणि चित्रपट निर्मिती या विषयांवर कार्यशाळा होणार असून दुपारी ३ ते संध्याकाळी ५ या वेळेत या कार्यशाळा घेण्यात येतील. या कार्यशाळा सशुल्क आहेत. त्यानंतर संध्याकाळी ५ ते ७ वाजेपर्यंत मनोरंजन आणि करमणुकीचे उपक्रम होतील.

मनोरंजन कार्यक्रमांमध्ये फ्लॅश मॉब, ओपन माइक, पपेट शो, नृत्य आणि गायन सादरीकरण, शिव तांडव नृत्य, कथाकथन यांचे आयोजन करण्यात आले आहे. १३ मे रोजी आनंद गोडसे यांचा ड्रम सर्कल हा कार्यक्रम होईल. १४ मे रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत ‘अनोखी सफर’ हा हेरिटेज वॉक घेण्यात येईल. १८ मे रोजी कर्वे स्त्री अभ्यास केंद्राच्या विद्यार्थिनींचे सांस्कृतिक सादरीकरण, २१ मे रोजी तुषार पंडित यांचे जादूचे प्रयोग होणार आहेत. हे कार्यक्रम निःशुल्क असतील. नाटकाची तिकीटे कार्यक्रमस्थळी प्रयोगाआधी एक तास मिळतील तसेच ticketkhidakee.com या संकेतस्थळावरदेखील उपलब्ध आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading