Wednesday, June 3, 2026
ENTERTAINMENTLatest News

बाहुबलीच्या दिग्दर्शकाला मराठमोळ्या धर्मवीरची भुरळ

भारतीय चित्रपटसृष्टीला प्रत्येकवेळी दर्जेदार व अजरामर कलाकृती देणारे दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांना ‘धर्मवीर मु.पो. ठाणे’ या मराठमोळ्या चित्रपटाने भुरळ घातली आहे. आज सकाळी धर्मवीरचे दिग्दर्शक प्रविण तरडे, निर्माते मंगेश देसाई आणि झी स्टुडिओजचे व्यवसाय प्रमुख मंगेश कुलकर्णी यांची हैदराबाद येथे एस. एस. राजमौली सोबत भेट झाली. यावेळी त्यांनी या चित्रपटाचा टिझर राजामौली यांना दाखवला. हा टिझर बघून ते अतिशय प्रभावित झाले.

दिग्दर्शक प्रविण तरडे म्हणाले की, “राजामौली सरांना मी कायमच माझा आदर्श मानत आलेलो आहे. त्यांनी दाक्षिणात्य चित्रपट ज्या भव्य दिव्यतेने जगभरात पोहचवला तसंच काही तरी भरीव आपल्याला मराठी चित्रपटाबद्दल करता यावं हीच इच्छा कायम मनात आहे. त्यांना भेटण्याची कायमच इच्छा होती आज धर्मवीरच्या निमित्ताने ती पूर्ण झाली.”

निर्माते मंगेश देसाई म्हणाले की, “जेव्हा बाहुबली चित्रपट बघितला होता तेव्हा कधीच विचार केला नव्हता की बाहुबलीच्या जन्मदात्याला भेटण्याची संधी मिळेल. पण आज तो योग जुळून आला. त्यांना भेटण्यापूर्वी मनात थोडी धाकधूक होती, थोडं दडपण होतं. पण ते जेव्हा समोर आले, आमच्याशी बोलले तेव्हा हे दडपण आपोआप गळून पडलं. चेहऱ्यावर किंवा वागण्यात कसलाही बडेजाव नसलेलं, अतिशय साधं व्यक्तिमत्त्व म्हणजे राजामौली सर हे या भेटीत जाणवलं.”

झी स्टुडिओजचे व्यवसाय प्रमुख मंगेश कुलकर्णी म्हणाले की,” प्रादेशिक भाषेतला चित्रपट केवळ त्या भाषांपुरताच मर्यादित न राहता तो जागतिक चित्रपट कसा बनू शकतो हे राजामौली सरांनी दाखवून दिले आहे. आज या भेटीतून या व्यक्तीचं चित्रपटाबद्दलचं प्रेम, या माध्यमावर असलेली हुकूमत हे त्यांच्याशी झालेल्या संवादातून जाणवलं. चित्रपटाचा टिझर त्यांना दाखवला असता ते म्हणाले की ही भाषा जरी मला कळत नसली तरी चित्रपटाचा लुक मला आवडला. कलाकारांचा अभिनय, पार्श्वसंगीत सर्वच उत्तम जमून आलंय. त्यांनी दिलेली ही दाद, ही प्रतिक्रिया आमच्यासाठी फारच मोलाची आहे. त्यांच्याकडून अतिशय सकारात्मक अशी ऊर्जा आम्हांला मिळाली आहे.’

झी स्टुडिओज, मंगेश देसाई यांच्या साहिल मोशन आर्ट्सची निर्मिती असलेला, आणि प्रविण तरडे यांच्या लेखन दिग्दर्शनाने सजलेला धर्मवीर मु.पो. ठाणे हा चित्रपट येत्या १३ मे रोजी महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading