दगडूशेठ दत्तमंदिर ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षाच्या बोधचिन्हाचे अनावरण
पुणे : बुधवार पेठेतील कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी (१२५ व्या) वर्षाच्या बोधचिन्हाचे अनावरण नुकतेच झाले. यासोबतच ट्रस्ट संचलित लक्ष्मीबाई अभ्यासिकेचा शुभारंभ स्व-रुपवर्धिनीच्या संयुक्त विद्यमाने झाला. आता स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे सुमारे १२५ विद्यार्थी या अभ्यासिकेचा यावर्षी लाभ घेणार आहेत.
दत्तमंदिर आणि दत्तभवन येथे झालेल्या कार्यक्रमाला श्री गिरनार संस्थानचे प्रमुख महंत प.पू. सोमनाथ बापू उपस्थित होते. तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त सतिश गोवेकर, दीपक मानकर, रघुनाथ येमूल गुरुजी, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, शाहीर हेमंत मावळे, पियुष शाह, स्व-रुपवर्धिनीचे संजय तांबट, अजय कदम, चंदन हायगुंडे, विनोद मोरे, ट्रस्टचे अध्यक्ष अॅड.प्रताप परदेशी, कार्यकारी विश्वस्त अॅड. शिवराज कदम जहागिरदार, खजिनदार महेंद्र पिसाळ, उप उत्सवप्रमुख युवराज गाडवे, ज्येष्ठ विश्वस्त सुनिल रुकारी, डॉ.पराग काळकर, अक्षय हलवाई आदी उपस्थित होते.
दत्तमहाराजांच्या सानिध्यात विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याची संधी मिळत असल्याने त्यांच्यामध्ये वेगळी उर्जा निर्माण होणार आहे. तसेच यामुळे या विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होईल. दत्तमंदिराच्या माध्यमातून धार्मिकतेसोबत सामाजिकतेकडे या उक्तीप्रमाणे कार्य सुरु असून यामुळे मंदिरात मिळणारा निधी समाजासाठी वापरला जात असल्याची बाब कौतुकास्पद असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
अॅड.प्रताप परदेशी म्हणाले, ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षात धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रमांसह सामाजिक उपक्रम देखील मोठया प्रमाणात राबविण्यात येणार आहेत. स्व-रुपवर्धिनीच्या सहकार्याने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका आणि त्यासोबतच पुढील काळात सुसज्ज ग्रंथालय देखील देण्याचा प्रयत्न आहे. चांगल्या कार्याला धार्मिक अधिष्ठान देण्याचा ट्रस्टचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. अभ्यासिकेत प्रवेशाकरिता संपर्क विनोद मोरे ८४५९३७८८९५, ७६२०५०२७०२ या क्रमांकावर संपर्क साधावा. अॅड.शिवराज कदम जहागिरदार यांनी सूत्रसंचालन केले. डॉ.पराग काळकर यांनी आभार मानले.
