भक्तीपूर्ण वातावरणात रसिक तल्लीन
पुणे : ‘प्रथम तुला वंदितो’ या गीताद्वारे श्री गणरायाच्या चरणी नमन करीत ‘माझे माहेर पंढरी’, ‘विठू माऊली तू माऊली जगाची’, ‘भवानी बेग पधारो तेरो चाकर करे पुकार’ अशा रचनांनी रसिकांना भक्तीपूर्ण रसाची अनुभूती मिळाली.
निमित्त होते ते प्रा. पंडित विजय नारायण देशपांडे आणि कश्मिरा सरनोबत यांच्या मैफलीचे! मैफलीची सुरुवात पद्मा तळवलकर यांच्या शिष्या कश्मिरा सरनोबत यांच्या शास्त्रीय गायनाने झाली. त्यांनी सुरुवातीस भूप रागातील पारंपरिक रचनेतील दृत बंदिश सादर केली. त्यानंतर सादर केलेल्या ‘भवानी बेग पधारो तेरो चाकर करे पुकार’ या देवीपर स्तुती भजनात रसिक तल्लीन झाले. ‘अवधूता युग न् युग हम योगी’ या निर्गुणी भजनानंतर त्यांनी श्यामला जोशी यांनी संगीतबद्ध केलेली संत मिराबाई यांची कृष्णरचना ‘श्याम बिना सखी रहा न जावा’ या रचनेने त्यांच्या मैफलीचा समारोप केला.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात पंडित विजय देशपांडे यांनी मैफलीत विविध भक्तीपूर्ण रचना सादर केल्या. ‘गाऊ गजानन गाथा’, ‘शालू रंगाने भिजला बाई ग काय करावे हरिला’ आणि ‘टाळ बोले चिपळीला’ या रचनांना रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. अभिजित पाटसकर (हार्मोनियम), गणेश तानवडे (तबला), उदय रामदास (पखवाज) यांनी समर्पक साथसंगत केली.
या कार्यक्रमात पंडित विजय देशपांडे यांनी गायलेल्या भक्तीरचनांच्या सीडीचे प्रकाशन समीर देशपांडे, उदय रामदास, ललिता देशपांडे, आनंद देशपांडे, सुधिंद्र सरनोबत यांच्या हस्ते करण्यात आले.