मनसे नेते संदीप देशपांडे व संतोष धुरी यांच्यावर गुन्हा दाखल
मुंबई : मुंबई पोलिसांच्या हातावर तुरी देत पळ काढणारे मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आज पासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हनुमान चालीसा आंदोलनाला सुरूवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात कायदा व सुव्यवस्था रहावी यासाठी मनसे कार्यकर्त्यांना पोलिस ताब्यात घेत आहेत. आज सकाळी मुंबई पोलीस संदीप देशपांडे यांना ताब्यात घेण्यासाठी गेले होते. मात्र पोलिसांना चकवा देत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आपल्या गाडीत बसत पळ काढला. यावेळी पोलीस त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करणारी महिला पोलीस कर्मचारी खाली कोसळली. संदीप देशपांडे हे निघून गेले. त्यानंतर याच प्रकरणात आता पोलिसांनी धुरी यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या दोघांचा शोध सध्या पोलीस घेत आहे.
