गर्भपाताच्या औषधांची ऑनलाईन विक्री; ॲमेझॉनसह विक्रेत्यावर गुन्हा दाखल  

मुंबई : ॲमेझॉन या ऑनलाईन पोर्टल वर A-care या ब्रँड नावाने गर्भपाताचे औषध उपलब्ध करून देऊन बेकायदेशीर रित्या विक्री केल्या प्रकरणी ॲमेझॉन व विक्रेत्यावर खेरवाडी पोलीस स्टेशन बांद्रा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करून हा गुन्हा दाखल केला आहे.

ऑनलाईन पोर्टलवर गर्भपातासाठी वापरात येणारी औषधे नियमबाह्य पद्धतीने विक्री होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले होते. याऑनलाईन विक्रीची पडताळणी करण्यासाठी विविध ऑनलाईन विक्री पोर्टल्स वर विनाप्रिस्क्रीप्शन MTP kit या औषधाची मागणी नोंदविण्यात आली होती. या औषधाची मागणी amazon.in द्वारे डॉक्टरांचे प्रिस्क्रीप्शन ची मागणी न करता स्वीकारली गेली व हे औषध कुरियरने प्राप्त झाले. या कुरियर पार्सलसोबत औषध विक्रीचे बिल प्राप्त झाले नाही.

या औषधाच्या विक्री प्रकरणात प्रशासनाने ॲमेझॉन सेलर्स सर्विसेस ला माहिती विचारणा केली असता या औषधे ओरिसा येथून पुरवठा करण्यात आल्याचे कळविण्यात आले. ॲमेझॉनने पुरविलेल्या माहितीच्या आधारे पुढील तपासात ओरिसा येथील विक्रेत्याने सदर औषध पुरविले नसून त्याचे औषध विक्री दुकानाचे कागदपत्रे वापरून सदर औषध विक्रीसाठी इतर व्यक्तीने ॲमेझॉनच्या ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी केली असल्याचे आढळून आले.

amazon.in या ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून विक्री करण्यात येणाऱ्या वस्तूच्या यादीत औषधे घटक अंतर्भूत नाही. वरील प्रकरणी A-Care या ब्रांड नावाने गर्भपाताच्या औषधाची विक्री संबंधित विक्रेत्याने व amazon.in  यांनी संगनमताने करून भारतीय दंड  संहिता,१८६०  औषधे सौंदर्य प्रसाधने कायदा, १९४० व नियम, १९४५ तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० अंतर्गत Intermediaries साठी असणाऱ्या नियमांचे उल्लंघन केले असल्याचे आढळून आले.  त्यामुळे amazon.in या ऑनलाईन विक्री पोर्टल व संबंधित विक्रेत्याविरुद्ध  खेरवाडी पोलीस स्टेशन बांद्रा (पूर्व) येथे  भारतीय दंड संहिता ,१८६० व माहिती व तंत्रज्ञान कायदा २००० सहवाचन औषधे सौंदर्य प्रसाधने कायदा १९४०  च्या विविध कलमाखाली दि. २९/०४/२०२२ रोजी औषध निरीक्षक (गुप्तवार्ता )मुख्यालय द्वारे गुन्हा दाखल  करण्यात आला आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: