टीम ‘तमाशा लाईव्ह’कडून मराठी सिनेसृष्टीला मानाचा मुजरा

काही महिन्यांपूर्वी बिग बजेट फिल्म ‘तमाशा लाईव्ह’चे पोस्टर झळकले होते. या पोस्टरमधील सोनाली कुलकर्णीचा जबरदस्त लूक बघून अनेकांना उत्सुकता लागून राहिली होती की, हा नक्की कशावर आधारित चित्रपट आहे. मात्र या चित्रपटातील एक एक गोष्टी आता गुलदस्त्याबाहेर येऊ लागल्या असून ‘तमाशा लाईव्ह’मधील ‘चित्रपटाची नांदी’ हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या जयंतीचे निमित्त साधून हे गाणे भव्यदिव्य स्वरूपात कर्जत येथील एन डी स्टुडिओ येथे प्रदर्शित करण्यात आले. १०० फूट व्यासपीठावर नृत्याचे आद्यदैवत नटराजाला नमन करून ‘चित्रपटाची नांदी’ची सुरुवात झाली. 

प्रेक्षकांच्या तुफान गर्दीत प्रदर्शित झालेल्या या गाण्याला क्षितिज पटवर्धन यांचे बोल लाभले असून पंकज पडघन यांनी संगीत दिले आहे. सिनेसृष्टीतील वेगवेगळ्या विभागात अमूल्य योगदान देणाऱ्या दिग्गजांचा सन्मान या गाण्याच्या माध्यमातून करण्यात आला आहे. या गाण्याची खासियत म्हणजे शौनक अभिषेकी, आनंद भाटे, राहुल देशपांडे आणि अनुराधा कुबेर असे शास्रीय संगीतातील नामवंत गायक यानिमित्ताने एकत्र आले आहेत. त्यामुळे संगीतप्रेमींसाठी हा एक संगीत नजराणाच आहे. तसेच या खास दिनाचे औचित्य साधत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली असून हा चित्रपट २४ जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

संजय जाधव दिग्दर्शित या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ जाधव, सचित पाटील, पुष्कर जोग, भरत जाधव, हेमांगी कवी, नागेश भोसले, मृणाल देशपांडे, मनमीत पेम, आयुषी भावे यांच्या भूमिका आहेत. संजय जाधव यांची पटकथा असलेल्या या चित्रपटाची कथा मनीष कदम यांनी लिहिली असून संवाद अरविंद जगताप यांचे आहेत. तर या चित्रपटाला अमितराज, पंकज पडघन यांचे संगीत लाभले असून क्षितिज पटवर्धन यांनी ही गाणी शब्दबद्ध केली आहेत. हा एक संगीतमय चित्रपट असून यात सुमारे तीस गाणी आहेत. 

‘तमाशा लाईव्ह’बद्दल दिग्दर्शक संजय जाधव म्हणतात, ” आपल्या मराठी संस्कृतीला लाभलेला भव्य परंपरेचा वारसा जतन करण्याचे काम मराठी सिनेसृष्टी नेहमीच करत आली आहे. याच परंपरेला आधुनिकतेचा साजही वेळोवेळी चढवण्यात आला. आज नितीन देसाई यांच्या स्टुडिओमध्ये एका मोठ्या महोत्सवात ‘चित्रपटाची नांदी’ हे गाणे प्रदर्शित होणे ही आमच्यासाठी नक्कीच अभिमानाची बाब आहे.’

सोनाली कुलकर्णी ‘तमाशा लाईव्ह’विषयी म्हणते, ” आज इतक्या प्रेक्षकांसमोर ‘चित्रपटाची नांदी’ हे गाणे प्रदर्शित करण्यात आले. हा माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे. पडद्यावर चित्रपट पाहताना जितका सोप्पा वाटतो. तितकाच आव्हानात्मक आणि कठीण तो पडद्यामागे असतो. पडद्यावर कलाकारांचे चेहरे दिसतात. परंतु पडद्यामागच्या कलाकारांची मेहनत कधीच दिसत नाहीत. आज या गाण्याच्या माध्यमातून आम्ही सर्वांचाच सन्मान करत आहोत.”

Leave a Reply

%d bloggers like this: