बारामती लोकसभा मतदार संघातील टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा; खासदार सुप्रिया सुळे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

पुणे : वाढत्या उन्हामुळे डिसेंबर महिन्यानंतरच बारामती लोकसभा मतदार संघातील डोंगराळ आणि दुर्गम भागात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होते. ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी तसेच जनावरांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते. त्याचबरोबर शेतीही पडीक ठेवावी लागत आहे. त्यामुळे ग्रामस्थांकडून या समस्येवर उपाय योजना होणे बाबत सातत्याने मागणी होत आहे. ही मागणी लक्षात घेऊन बारामती लोकसभा मतदार संघाच्या जुन्या टंचाई आराखड्यासोबत पुरवणी टंचाई आराखड्यातील गावांनाही टँकरने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे केली.

मतदार संघातील पाणी टंचाई तसेच अन्य प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी खासदार सुळे यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांसोबत आज बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी ही मागणी केली. तसेच लेखी निवेदनही दिले. माजी आमदार रमेश थोरात, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतारे, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य विक्रम खुटवड व अमित कंधारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाजी होळकर, माणिकराव झेंडे, त्रिंबक मोकाशी, अप्पासाहेब पवार, महादेव कोंढरे, योगिनी दिवेकर तसेच अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

बारामती लोकसभा मतदार संघाचा बराचसा भाग सह्याद्रीच्या डोंगरी आणि दुर्गम भागात येत असल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस होतो. तथापि या ठिकाणी पाणी साठविण्याची व्यवस्था नसल्याने पावसाचे सर्व पाणी वाहून जाते. तसेच जमिनीची पाणी साठवण क्षमताही कमी असल्याने या परिसरात पाण्याचे नैसर्गिक साठे कमी प्रमाणात आहेत. या मतदार संघात जसा डोंगरी भाग आहे, तसाच पुरंदर, इंदापूर, दौंड, बारामती या तालुक्यांचा बराचसा भाग कमी पर्जन्य छायेचा आहे. त्यामुळे या भागातही पाणी टंचाई दरवर्षी भेडसावत असते. वाढत्या उन्हामुळे डिसेंबर महिन्यानंतरच या परिसरात तीव्र पाणी टंचाई निर्माण होते. ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी तसेच जनावरांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते. त्याचबरोबर शेतीही पडीक ठेवावी लागत आहे. ग्रामस्थांकडून या समस्येवर उपाय योजना होणे बाबत सातत्याने मागणी होत आहे, तरी याबाबत तातडीने सर्वेक्षण करून जुन्या आणि नव्या टंचाई आराखड्यातील गावांनाही लवकरात लवकर टँकरने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी सुळे यांनी यावेळी केली.

Leave a Reply

%d bloggers like this: