Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

पालिकेवर प्रशासक लागू झाल्यामुळे पदाधिकाऱ्यांची कार्यालये सील होणार

पुणे :महापालिका सभागृहाची मुदत संपुष्टात आल्यानंतर सर्व कारभार प्रशासनाच्या हातात देण्यात आला आहे. प्रशासक म्हणून आयुक्‍तांची नेमणूक झाली आहे. त्यामुळे महापालिकेतील राजकीय पदाधिकाऱ्यांच्या दालनांचा ताबा नगरसचिव कार्यालयाने घेण्याला सुरुवात केली आहे.
महापालिकेतील कार्यकारिणीचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. अद्याप निवडणुका जाहीर न झाल्याने येथे प्रशासक नेमला आहे. 14 मार्चनंतर पदाधिकाऱ्यांचे पदही संपुष्टात आल्याने त्यांना कार्यालयेही मोकळी करावी लागली आहेत. ही कार्यालये नगरसचिव विभागाने ताब्यात घेण्याला सुरुवात केली आहे. त्यामध्ये कार्यालयांमध्ये असलेली राजकीय पक्षांची चिन्हे झाकण्यात येत आहेत तर काही कार्यालयांना सील केले आहे. त्यामुळे तेथे ‘एन्ट्री’ करण्याला मनाई करण्यात आली आहे.
त्यामध्ये महापौर, सभागृह नेते, स्थायी समिती, विविध पक्षनेते यांची दालने आणि सभागृहांसह अँटी चेंबरचाही समावेश आहे. सध्या या दालनांमधील सर्व फाइल गोळा करणे, महापालिकेशी संबंधित वस्तू, कागदपत्रे एकत्र करून त्यांची नोंद करून हा सर्व दस्तावेज स्टोअर रुममध्ये हलवण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही सर्व कामे पूर्ण झाल्यावर 31 मार्चनंतर येथे कार्यरत असलेले सर्व कंत्राटी सेवक हे कार्यमुक्‍त केले जाणार आहेत.
याशिवाय पदाधिकाऱ्यांच्या दालनात असलेले स्वीय सहायक, लिपिक, शिपाई आदी कर्मचाऱ्यांची नियुक्‍ती ही येत्या सोमवारपासून नगरसचिव कार्यालयात करण्याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात येणार आहे. तसेच सोमवारनंतर महापालिकेच्या नवीन इमारतीत असलेली पदाधिकाऱ्यांची सर्व दालने सील केली जाणार आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading