मुखवटे नसणार्‍या चेहर्‍यांपर्यंत पोहोचणे अवघड : कवी-गीतकार वैभव जोशी यांचे प्रतिपादन

पुणे : ‘कवी शब्दांचे ईश्वर.. साकारताना’ या पुस्तकातील कवी माझी दैवते आहेत, या कवींपर्यंत पोहोचणे म्हणजे आयुष्यभराचा चकवा लावून घेण्यासारखे आहे. या प्रत्येक कवीमधील माणसापर्यंत, त्यांच्यातील दैवी प्रतिभेपर्यंत पोहोचणे अवघड आहे. तुम्ही आयुष्यात एका कवीच्या व्यक्तिमत्त्वाला दोनदा भेटू शकत नाही, असे प्रतिपादन कवी-गीतकार वैभव जोशी यांनी केले. खूप मुखवटे असणार्‍या चेहर्‍यांपर्यंत पोहोचणे सोपे आहे, परंतु मुळात ज्यांच्याकडे मुखवटेच नाही, ज्यांना चेहरेच चेहरे आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचणे हे शिवधनुष्य पेलण्यासारखे आहे, असेही त्यांनी नमूद केले.

मराठी भाषेचे वैभव आपल्या काव्यनिर्मितीतून दाखविणार्‍या कवींना बोलते करताना, त्यातून मालिका साकारताना आलेल्या रोमांचक अनुभवांवर आधारित ‘कवी शब्दांचे ईश्वर..साकारताना’ या अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या माजी अध्यक्ष डॉ. माधवी वैद्य लिखित पुस्तकाचे प्रकाशन  जोशी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील होते, त्यांच्या हस्ते ‘कवी शब्दांचे ईश्वर’ मालिकेतील कवयित्री इंदिरा संत यांच्यावरील भागाचे प्रसारण करून आर्या कम्युनिकेशन्स, पुणे या यूट्यूब चॅनलचा शुभारंभ करण्यात आला. लेखिका वीणा संत प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या, त्यांच्या हस्ते ‘कवी शब्दांचे ईश्वर’ या ई-बुकचे प्रकाशन करण्यात आले. डॉ. माधवी वैद्य यांच्यासह बुकगंगा पब्लिकेशन्सच्या संचालिका सुप्रिया लिमये, संगीतकार राहुल घोरपडे व्यासपीठावर होते.

जोशी म्हणाले, पुस्तक वाचताना अनेक कवींच्या प्रदेशात फिरून आल्याचे जाणवले. एका कवीपर्यंत पोहोचतानाही आपल्यासारख्याला अवघड जाते, तेव्हा माधवी वैद्य यांनी 13 कवींपर्यंत पोहोचून त्यांचे शब्दवैभव आणि रूप आपल्यापर्यंत पोहोचविले, तेही कुठचा शॉर्टकट न घेता, खडतर प्रवास करून, हे खूप मोठे कार्य आहे.

वीणा संत म्हणाल्या, कवी, त्यांचे घर, त्यांचा स्वभाव या विषयी जाणून घेण्याची सर्वसामान्यांच्या मनात इच्छा असते, या मालिकेद्वारे ती सफल झाली. कवीच्या व्यक्तिगत भावजीवनातील गोष्टी कवीला घडवत असतात,त्याच्या जाणिवांना प्रगल्भ करीत असतात. ‘कवी शब्दांचे ईश्वर’ मालिकेद्वारे कवीचे आरशातील स्वच्छ प्रतिबिंब दाखविले गेले आहे. या पुस्तकाद्वारे अभ्यास आणि मनोरंजन अशा दोन्ही गोष्टी साधल्या गेल्या आहेत.

सुप्रिया लिमये यांनी मनोगत व्यक्त केले. धनेश जोशी यांनी ना. धों. महानोर यांच्या संदेशाचे वाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजाता शेणई यांनी केले.

Leave a Reply

%d bloggers like this: