एकतर्फी प्रेमातून विद्यार्थीनींवर झालेल्या हल्ला प्रकरणाचा कार्यवाही अहवाल सादर करा – डॉ. नीलम गोऱ्हे  

मुंबई : ‘राज्यात शाळा आणि महाविद्यालयांमध्ये गेल्या वर्षभराच्या काळात एकतर्फी प्रेमातून हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यांचा तपास आणि पोलिसांकडून काय कार्यवाही करण्यात आली याचा अहवाल सादर करा, निर्देश आज विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज गृह विभागाला दिले. तसेच शाळा महाविद्यालये आणि सामाजिक संस्थामध्ये विशाखा समितीची स्थापना आणि कार्यवाही सुरु आहे की नाही याचा अहवाल सादर करण्यास सांगितले.

गेल्या वर्षभराच्या काळात महाराष्ट्रात विविध ठिकाणी झालेले महिला अत्याचार, एकतर्फी प्रेमातून मुली आणि महिलांवर होणारे हल्ले आणि त्यावर राज्य शासनाकडून केलेली कार्यवाही याचा आढावा आज विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विशेष बैठकीत आज घेतला.

यावेळी महिला व मुलींसाठीचे सुरक्षाविषयक नियम आणि तक्रार कुठे करायची याबाबत योग्य ती यंत्रणा तयार करून कार्यान्वित करा. शाळांमध्ये असलेल्या व्यावसायिक समाजकार्य शिक्षण घेतलेल्या कर्मचाऱ्यांना विद्यार्थी समुपदेशनात सहभागी करून घ्या. पोलीस दक्षता समितीसोबतच उपसमिती तयार करून त्यात किमान शाळा विषयक कामातील ५ सदस्य ठेवून स्थानिक स्वयंसेवी संस्थाचा सहभाग घेण्यात यावा. या समित्यांच्या कामाचा तालुका स्तरावर नियमित अहवाल आणि आढावा घेण्यात यावा. शाळेत जाणाऱ्या आणि रात्रीच्या वेळी एकटीने प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेचा विचार करून प्रवासी सुरक्षितता धोरण तयार करण्यात यावे,’ असे निर्देशही डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज प्रशासनाला दिले.

शालेय शिक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी, गृह विभाग (विशेष) प्रधान सचिव संजय सक्सेना, राज्य परिवहन महामंडळ उपाध्यक्ष शेखर चन्ने, तंत्र शिक्षण सहसंचालक प्रमोद नाईक, संचालक डॉ. अभय वाघ, उच्चशिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. प्रकाश बच्छाव, परिवहन उपायुक्त दिनकर मनवर, राजेंद्र मदने, वैद्यकीय शिक्षण विभागाचे उपसचिव सुरेंद्र चानकर, पोलीस महानिरीक्षक रवींद्र सेनगावकर गृह विभागाचे सहसचिव राहुल कुलकर्णी, पोलीस उपायुक्त रश्मी जाधव हे अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.

डॉ. गोऱ्हे पुढे म्हणाल्या, ‘शाळेत जाता येताना प्रवासात काही अपप्रकार घडल्यास याबाबत तक्रार कोणाकडे आणि कशी करावी याबाबत विशेष यंत्रणा तयार करण्यात यावी. सार्वजनिक वाहनातून प्रवास करताना पोलिसांची मदत मागणारी यंत्रणा बसविण्यात यावी. काही रिक्षाचालकानीही विद्यार्थिनीवर अत्याचार करण्याच्या घटनांचा तपास करून काय कारवाई झाली याची माहिती नागरिकांना नियमितपणे द्यावी. रिक्षाचालकांना विशेष प्रकारचे प्रशिक्षण देण्यात यावे अशा सूचना परिवहन विभागाला देण्यात आल्या. रिक्षा परवाना देताना वाहनचालकाचे चारित्र्य प्रमाणपत्र तपासून घेण्यात यावे’, असेही त्या म्हणाल्या.

 

 

Leave a Reply

%d bloggers like this: